देवेंद्र फडणवीसांची शिष्टाई यशस्वी, अण्णा हजारे यांचं आंदोलन स्थगित
अण्णा हजारे यांचं उपोषण मागे
पुणे : समाजसेवक अण्णा हजारे यांचं आंदोलन स्थगित झालं आहे. उपोषण न करण्याचा निर्णय अण्णा हजारे यांनी घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई यशस्वी झाली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अण्णा हे उद्यापासून आंदोलन करणार होते. पण आता हे आंदोलन स्थगित करत असल्याचं अण्णा हजारे यांनी जाहीर केलं आहे. मागण्यां संदर्भात उच्च स्तरीय समिती स्थापन करणार असून समितीच्या माध्यमातून सर्व प्रश्नांवर 6 महिन्याच्या आत समाधानकारक मार्ग काढला जाणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. त्यामुळे अण्णा हजारे समाधानी आहेत.
अण्णा हजारे यांनी म्हटलं की, अन्याय अत्याचाराच्या विरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार घटनेनं दिलेला आहे. स्वामिनाथन आयोगाचा अहवाल सरकारने स्वीकारला पण अंमलबाजवणी नाही. सरकारने आश्वासन पाळलं नाही म्हणून आंदोलन करणार होतो. आज फडणवीस आणि चौधरी आले, त्यांनी मागण्या मान्य असल्याचं पत्र दिलं आहे. 15 मुद्द्यांवर निर्णय होणार आहे. म्हणून आंदोलन स्थगित करीत आहे. असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.