TikTok Star Santosh Mundeच्या मृत्यूची धनंजय मुंडेंनी घेतली दखल, महावितरणाकडे केली `ही` मागणी
टिकटॉक स्टार संतोष मुंडेच्या निधनावर धनंजय मुडेंची भावूक पोस्ट, (Dhananjay Munde on Santosh Mundes Death)
Dhananjay Munde on Santosh Munde : टिकटॉक स्टार संतोष मुंडेचा शॉक लागून मृत्यू झाला. संतोषच्या अकाली जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. टिकटॉक स्टार संतोष मुंडेने (Santosh Munde) त्याच्या सहज विनोद आणि देहबोलीचा कलात्मक वापर करून टिकटॉकनंतर बरीच प्रसिद्धी मिळवली होती. संतोषच्या मृत्यूवर सर्वांनी शोक व्यक्त केला आहे. अशातच बीड जिल्ह्यातील परळीचे राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनीही फेसबुक पोस्टद्वारे श्रद्धांजली अर्पण केली आहे. (Dhananjay Munde on Santosh Mundes death demanded to Mahavitra latest marathi news)
धनंजय मुंडेंची भावूक पोस्ट -
बीड जिल्ह्यातील भोगलवाडी (ता.धारूर) येथील एका सामान्य शेतकरी कुटुंबातील टिकटॉकवरून प्रसिद्धीस आलेला संतोष मुंडे व त्याच्या सोबतच्या आणखी एका तरुणाचा विजेच्या ट्रान्सफॉर्मर वरील फ्यूज जोडताना अचानक वीज प्रवाह सुरू होऊन अपघात घडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याचे दुःखद वृत्त समजले. एका गरीब शेतकरी कुटुंबातील संतोषने ग्रामीण भाषा, सहज विनोद व देहबोलीचा कलात्मक वापर करून प्रसिद्धी मिळवली होती. दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली.
शेतकऱ्यांच्या पोरांना ग्रामीण भागातील विजेचा लपंडाव आणि अपुऱ्या सुविधा यामुळे सतत बरीच अशी कामे पर्याय नसल्याने आपला जीव धोक्यात घालून स्वतः करावी लागतात. या दुर्दैवी अपघाताची जबाबदारी महावितरणने घ्यावी, अपघातात नेमकी कुणाची चूक, हे समोर आले पाहिजे. संतोष आणि अपघाती मृत्यू झालेल्या अन्य तरुणाच्या कुटुंबास महावितरणने तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.
संतोष आणि बाबुराव हे भोगलवाडे ते काळेचीवाडी या रस्त्यावर असणाऱ्या वीजेचा डिपीचा फ्युज टाकण्यासाठी गेले होते. मात्र तिथे शॉक लागून दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला. संतोष मुंडे महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला होता. संतोषचा रील्स पाहिला की नकळत तुमच्या चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहायचं नाही.
दरम्यान, संतोष मुंडेच्या मृत्यूनंतर राज्यभरातून सोशल माध्यमांवर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. संतोष हा हटके मराठवाड्यातील ग्रामीण स्टाईलने रील्स बनवायचा. संतोषच्या निधनाची बातमी समजताच चाहत्यांनाही विश्वास बसत नाहीये.