बीड येथे धनंजय मुंडे यांना झटका, भाजपच्या यशानंतर पंकजा मुंडे यांची अशी प्रतिक्रिया
Beed Nagar Panchayat Election 2022 : बीड येथील नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना जोरदार धक्का बसला आहे.
बीड : Beed Nagar Panchayat Election 2022 : बीड येथील नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना जोरदार धक्का बसला आहे. पाच पैकी तीन ठिकाणी भाजपने सत्ता आणली आहे. तर एका ठिकाणी राष्ट्रवादी आणि आंधळे प्रणित आघाडीने काठावर सत्ता घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व दिसून येत असल्याने ताईने बाजी मारल्याची चर्चा आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना टोला लगावला आहे. बीडमधील लढतीने भविष्याचे संकेत दिले आहेत, असे पंकजा मुंडे ( Pankaja Munde) यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यातील पाच नगर पंचायत निवडणुकीचे निकाल घोषीत झाले असून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी चार नगर पंचायतीमध्ये पॅनल उभे केले होते. यातील आष्टी, पाटोदा आणि शिरुरमध्ये भाजपने एकहाती सत्ता काबीज केली आहे. तर वडवणीत राष्ट्रवादी आणि आंधळे प्रणित आघाडीला काठावरचे बहुमत मिळाले. केजचा निकाल त्रीशंकू लागला आहे. विद्यमान सत्ताधारी असलेल्या काँग्रेसला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या डॉक्टर कन्येला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
दरम्यान, भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या आष्टी नगरपंचायतीत भाजपने निर्विवाद वर्चस्व कायम राखले आहे. एकूण 17 जागांपैकी 11 जागांवर भाजप उमेदवार विजयी झाले. एका ठिकाणी भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार विजयी झाला तर राष्ट्रवादी 2, काँग्रेस 1 आणि अपक्ष 2 ठिकाणी विजयी झाले आहेत.
शिरुरमध्ये भाजपचा बोलबाला दिसून आला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शेख मेहबुब यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने पुन्हा वर्चस्व मिळवले. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आमदार सुरेश धस यांनी या ठिकाणची नगरपंचायत ताब्यात ठेवण्यात यश मिळवले आहे. या ठिकाणी भाजप 11, राष्ट्रवादी 4, शिवसेना 2 जागा मिळाल्या आहेत.
पाटोदा नगरपंचायतीत भाजपने सत्ता आली आहे. विरोधी पक्षांची धुळधाण उडवत या ठिकाणी भाजपचे 9 आणि आ. सुरेश धस गटाचे 6 असे एकून भाजपचे 15 उमेदवार विजयी झाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
वडवणीत नगर पंचायतीची निवडणूक अतिशय जोरदार झाली. शेवटच्या जागेचा निकाल लागेपर्यंत कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट होत नव्हते. 17 पैकी 16 जागांचे निकाल घोषीत झाले तेव्हा भाजप 8 आणि राष्ट्रवादी 8 अशी निकालाची उत्कंठा वाढवणारी स्थिती होती. शेवटी 17 व्या जागेचा निकाल घोषीत झाला आणि राष्ट्रवादी आणि आंधळे प्रणीत शहर बजाव आघाडीने 9 जागा जिंकून काठावरचे बहुमत मिळवले.
केजमध्ये विद्यमान सत्ताधारी असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी, जनविकास आघाडी आणि शिवसेना अशी चौरंगी लढत झाली. यात विद्यमान सत्ताधारी काँग्रेसला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी 5, हरुण इनामदार यांची जनविकास आघाडी 8 आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक उमेदवार विजयी झाला. केजचा निकाल त्रिशंकू लागला आहे. कोणाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही.
बीड जिल्ह्यातील पाच नगर पंचायतींच्या 85 जागांसाठी निवडणूक झाली. यात केवळ 17 जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे राष्ट्रवादीचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना मोठा धक्का मानला जात आहे.