धनगर आरक्षणासंदर्भात बैठक निष्फळ, यशवंत सेना उपोषण मागे न घेण्यावर ठाम
धनगर आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांबरोबरची बैठक निष्फळ ठरली आहे. येत्या 2 महिन्यांत अहवाल सादर करुन एसटी प्रमाणपत्रं देण्याची मागणी गोपीचंद पडळकर यानी केली आहे. तर सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय.
Dhangar Reservation : धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी यशवंत सेनेच्या (Yashwant Sena) वतीने सोळा दिवसांपासून उपोषण सुरू आहे. या आंदोलनातील दोघांनी आमरण उपोषण (Hunger Strike) सुरू केलंय दोघांचीही तब्येत बिघडलीय. अहमदनगरच्या चोंडीमध्ये उपोषण करणाऱ्या सुरेश बंडगर यांची प्रकृती खालावलीय. त्यांना ऑक्सिजन लावण्यात आलाय. यातील बाळासाहेब रुपनवर यांच्यावर पुण्यातल्या ससूनमध्ये उपचार सुरू आहेत तर चौंडीमधल्या सुरेश बंडगर यांचीही तब्येत जास्त बिघडलीय.
बैठक निष्फळ
धनगर समाजाच्या (Dhangar Reservation) एसटी आरक्षणाच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची सह्याद्रीवर घेतलेली बैठक निष्फठ ठरलीय. सरकारनं तोडगा काढण्यासाठी दोन-तीन महिन्यांच्या वेळ मागितला. मात्र चौंडीमध्ये सुरू असलेलं उपोषण मागे न घेण्याची भूमिका यंशवंत सेनेनं घेतलीय. सरकारनं आपला वेळ घेऊन उपाय काढावा. मात्र तोपर्यंत उपोषण सुरू राहणार आहे. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढलीय. तर दुसरीकडे भाजप आमदार गोपीचंद पडळकर हेदेखील उपस्थित होते. सरकारनं दोन महिन्यांत एसटी आरक्षणाबाबत अहवाल सादर करून एसटी आरक्षणाचं प्रमाणपत्र देण्याची मागणी केल्याचं त्यांनी सांगितलं.
दुसरीकडे धनगर संघटनांसोबतची बैठक सकारात्मक झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. इतर राज्यांनी घेतलेल्या निर्णय़ाचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. तर सरकार सकारात्मक असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं.
ओबीसी महासंघाचा उपोषणाचा इशारा
दरम्यान, राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आरक्षणावरून चाललेल्या आंदोलनात बेमुदत उपोषणाचा इशारा दिलाय. सरकारने लेखी आश्वासन दिलं नाही तर सोमवारपासून बेमुदत उपोषणाचे अस्त्र उभारण्यात येईल असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाने दिलाय. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, ओबीसींची आरक्षण मर्यादा वाढवावी या मागणीसाठी गेल्या बारा दिवसांपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे आंदोलन सुरू आहे. आंदोलन सुरू झाल्यानंतर आंदोलकांनी साखळी स्वरूपात उपोषण सुरू करत सरकारचे लक्ष वेधलं. तर चंद्रपूर येथे रवींद्र टोंगे यांनी अन्नत्याग आंदोलनही चंद्रपूरला सुरू केलंय. आता राष्ट्रीय ओबीसी महासंघ आक्रमक झाला असून सरकारकडे लेखी आश्वासनाची मागणी करत सोमवार पर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. त्यानंतर बेमुदत उपोषणाचा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाने दिलाय..