शेतकऱ्यांना अटक करणारे फडणवीस सरकार ब्रिटीश मनोवृत्तीचे- धनंजय मुंडे
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात अडथळा नको म्हणून अटक.
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धुळे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांना अटक करण्याच्या मुद्द्यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला धारेवर धरले. दौऱ्यात अडथळा नको म्हणून शेतकऱ्यांना अटक करणारे फडणवीस सरकार ब्रिटीश मनोवृत्तीचे आहे, अशी सणसणीत टीका धनंजय मुंडे यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी धुळे जिल्ह्याचा दौरा केला. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून सकाळी ८ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत धर्मा पाटील यांच्या पत्नी सखूबाई आणि मुलगा नरेंद्र या दोघांना दोंडाईचा पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले होते.
मुख्यमंत्री फडणवीस दोंडाईचा परिसरातून निघून गेल्यानंतर सखूबाई व नरेंद्र पाटील यांना पोलिसांनी सोडले. मात्र, नरेंद्र पाटील यांनी पोलीस स्टेशनमधून परत जाण्यास नकार दिला. त्यांनी या प्रकाराचा निषेध व्यक्त करताना म्हटले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यात आपण कोणत्याही गैरकायदेशीर मार्गाचा अवलंब करणार नाही. माझ्याकडून असे कोणत्याही प्रकारचे कृत्य होणार नाही. तरिही मला आणि माझ्या आईला सकाळी सहा वाजेपासून पोलीस स्टेशनला विनाकारण बसवून ठेवले. त्यामुळे आता स्वत: मंत्री पोलीस स्टेशनला येत नाही, तोपर्यंत आपण येथून जाणार नाही, अशी भूमिका नरेंद्र पाटील यांनी घेतली होती. दरम्यान, आगामी काळात लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान अनेक मंत्री याठिकाणी येतील. तेव्हा दरवेळेस मला आणि माझ्या कुटुंबियांना अशापद्धतीने त्रास दिला जाईल का, असा प्रश्न नरेंद्र पाटील यांनी उपस्थित केला.
सरकारने आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही सर्व कुटुंब सामूहिक आत्महत्या करु, असा इशारा मंत्रालयात आत्म्हत्येचा प्रयत्न केलेल्या शेतकरी धर्मा पाटील यांच्या पत्नी सखुबाई पाटील यांनी दिला होता.