ज्ञानेश्वर पतंगे, झी मीडिया, धाराशिव : एखादा व्यक्ती संपत्तीने नाही तर मनाने श्रीमंत असली पाहिजे असं आपण वारंवार म्हणतो. मात्र याची प्रचिती आता धाराशिव जिल्ह्यात (Dharashiv News) आली आहे. दौलत असून उपयोग नाही दानत असली पाहिजे या म्हणीला सत्यात उतरवत धाराशिवमधील एका आजीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. समस्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेला विठुरायच्या चरणी (Pandharpur) या आजीने स्वतःची सहा एकर शेती विकून सोन्याची आभूषणे अर्पण केली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धाराशिव जिल्ह्यातील बेंबळी येथील वाघे आजीने स्वतःची जमीन विकून आतापर्यंत एक दोन नव्हे तर तब्बल विविध देवस्थानाला 50 लाख रुपयांचे दान केले आहे. धाराशिव तालुक्यातील बेंबळी गावच्या बाई लिंबा वाघे असं या 80 वर्षाच्या वृध्द दानशूर आजीचे नाव आहे. वाघे आजी यांनी आपली स्व:ताची जमीन विकून पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी 18 लाखाचे सोने अर्पण काही दिवसांपूर्वी केले होते. त्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.


वाघे आजीच्या घरी लाईटही नाही


वाघे आजीला मुलं,बाळं नसून पतीचेही अनेक वर्षांपूर्वी निधन झाले आहे. वाघे आजींनी आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी 50 लाख रुपयांपेक्षा जास्त  सोने, चांदी अशा वेगवेगळ्या स्वरुपात दान केले आहे. स्व:ताची जमीन विकून एवढ दान करणाऱ्या वाघे यांच्या घरी जास्त बिल येतं म्हणून त्यांनी घरी लाईट सुध्दा घेतली नाही. वाघे आजी त्यांचा स्वयंपाकही चुलीवरतीच करतात.


बाई वाघे यांनी यापूर्वी रुईभर येथील श्री दत्तमंदिरात कळसासाठी एक तोळे सोने व एक किलो चांदी अर्पण केली होती. पळसवाडीतील मारुती मंदिरासाठी सात लाख रुपयांच्या मूर्ती, शिवाजीनगर (धाराशिव) येथील खंडोबा मंदिरात दोन लाख रुपयांच्या मूर्ती, अक्कलकोटच्या मंदिराच्या अन्नछत्रात भांडी दिली आहेत. तसेच बेंबळीतील खंडोबा मंदिराचा जिर्णोद्धारही त्यांनी केला आहे.