Dharashiv Tuljapur Solapur Railway Project : महाराष्ट्रात नव्या रेल्वे मार्गाचे भूमीपूजन झाले आहे. धाराशिव-तुळजापूर-सोलापूर असा हा रेल्वे मार्ग आहे. या नव्या रेल्वे मार्गामुळे तुळजाभवानीचे तुळजापूर तीर्थक्षेत्र रेल्वेच्या नकाशाला जोडले जाणार आहे. एकूण 110 किमी लांबीचा हा रेल्वे मार्ग आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे प्रकल्पाच्या कामाला गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर आज सुरुवात करण्यात आलीय. तुळजापूर मतदार संघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नारळ फोडून या कामाचे उदघाटन करुन प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणारे हे कार्य निर्विघ्नपणे पूर्ण व्हावे ही प्रार्थना गणरायाच्या चरणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली.


महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी तीर्थक्षेत्र हे रेल्वे लाईनला जोडण्यासाठी मुहूर्त सापडला आहे. या रेल्वे मार्गामुळे धाराशिव येथे जंक्शन होणार असून आई तुळजाभवानीचे तुळजापूर तीर्थक्षेत्र रेल्वेच्या नकाशाला जोडले जाणार आहे. त्यामुळे या भागातील पर्यटनाला नवी दिशा मिळणार आहे. रोजगार निर्मिती व अर्थकारणाला मोठी चालना मिळणार असुन देशाच्या कानाकोपऱ्यातून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी सोय होणार आहे.  साडेतीन शक्तिपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेले तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्र तुळजापूर संपूण देशासह जोडले जाणार आहे. 


असा असेल धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्ग


सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या एकूण 84.44 किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्ग तीन टप्प्याचा असणार आहे. या रेल्वेमार्गावर एकूण 110 पूल आणि तीन मोठे उड्डाणपूल असणार आहेत. तुळजापूर राज्यातील एकमेव प्रमुख तीर्थक्षेत्र, जिथे अद्याप रेल्वेची सुविधा नाही. परिणामी, मुंबई-पुण्यासह अन्य महानगरांतून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होते. मात्र, या नव्या रेल्वे सेवेमुळे भाविकांची गैरसोय दूर होणार आहे.