आतिष भोईर, कल्याण : कोरोनाचे दररोज नवनवीन रेकॉर्ड होत असलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात आता धारावी पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी ही माहिती दिली. धारावी पॅटर्नच्या माध्यमातून आता हाताबाहेर गेलेल्या कल्याण डोंबिवलीतील कोरोनाला रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या पॅटर्ननुसार कोरोनाचे हॉटस्पॉट असणाऱ्या भागात घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकाची तपासणी, करोनाची लक्षणे दिसणाऱ्या नागरिकाची अलगीकरणात रवानगी, त्यांची स्वब टेस्ट, करत 10 दिवसात जास्तीत जास्त कोरोना रुग्ण शोधून काढत शहरातील करोनाचा प्रसार आटोक्यात आणणारा चेस द व्हायरस असा हा धारावी पॅटर्न आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धारावीत हा पॅटर्न यशस्वी झाल्यानंतर कल्याण-डोंबिवली शहरात देखील हा पॅटर्न राबविण्याचा निर्णय पालिका आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी यांनी घेतला आहे. यासाठी उपायोजना सुरू करण्यात येत असून लोकप्रतिनिधींनी त्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे. 


दरम्यान कल्याण डोंबिवलीतील एकूण नगरसेवकांपैकी मोजकेच नगरसेवक कोरोना काळात नागरिकांची सेवा करताना दिसत होते. त्यातील काही जण आता कोरोनाग्रस्त झाले असून महापालिका आयुक्तांच्या आवाहनाला इतर नगरसेवक कितपत प्रतिसाद देतात हा मोठा प्रश्न आहे.