ध्रुव राठी प्रकरण, चावीवाल्याला मारहाण भोवली; मुंबईतील पोलीस इन्सपेक्टर निलंबित! जनआंदोलानंतर निलंबन
Dhruv Rathi Case Police Suspended: लोकांनी पोलीस उपायुक्तलायाबाहेर केलेल्या आंदोलनानंतर या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत हे आंदोलन सुरु होतं.
Dhruv Rathi Case Police Suspended: जनआंदोलनानंतर वसईमधील माणिकपूर पोलीस स्टेशनमधील एका अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. वेगवेगळ्या सामाजिक तसेच राजकीय संघटनांनी पोलीस उपायुक्त कार्यालयाबाहेर शनिवारी सलग 5 तास धरणे आंदोलन केलं. या आंदोलनानंतर मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला पोलीस दलातून निलंबित करण्यात आलं आहे. निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव राजशेखर सलगरे असं आहे. सलगरे हे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते.
दुपारी 3 पर्यंत सुरु होतं आंदोलन
पोलिसांच्या या दडपशाही मनमानी कारभाराचा निषेध करण्यासाठी 1 जून रोजी वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी एकत्र येत सकाळी 10 वाजल्यापासून आंदोलन केलं. वसईच्या परिमंडळ 2 च्या पोलीस उपायुक्ता पूर्णिमा चौगुले-श्रींगी यांच्या कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आलेलं हे आंदोलन दुपारी 3 वाजेपर्यंत सुरु होतं. सलगरे यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. त्यांच्याकडून सर्वसामान्यांना दिली जाणारी वागणूक योग्य नव्हती, ते मनमानी पद्धतीने कारभार करायचे असे आरोप अनेकांनी केले होते.
चावीवाल्याला मारहाण अन् ध्रुव राठी व्हिडीओ प्रकरण
काही दिवसांपूर्वीच माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये 20 रुपयांवरुन झालेल्या वादावरुन तक्रार नोंदवण्यासाठी आलेल्या चावी बनवणाऱ्या मोहम्मद अन्सारी नावाच्या व्यक्तीला सलगरे यांनी बेदम मारहाण केली होती. अन्य एका घटनेमध्ये वसईतील सामाजिक कार्यकर्ते वकील आदेश बनसोडे यांच्याविरोधात ध्रुव राठीचा व्हिडीओ व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर केल्याप्रकरणी सलगरे कार्यरत असलेल्या माणिकपूर पोलीस स्टेशनमध्येच कार्यरत होते. त्यांच्या निलंबनामागे या प्रकरणाचा संदर्भ असल्याचीही चर्चा आहे.
सलगरे यांच्या निलंबनाची मागणी करत करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये अनेक राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारीही सहभागी झाले होते. यात उद्धव ठाकरे गट, काँग्रेस, आम आदमी पार्टीबरोबरच मी वसईकर, पर्यावरण समिती, जनआंदोलन समिती, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, वकील संघटना, समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. सदर पोलीस कर्मचाऱ्याविरोधात कारवाई करण्यात आल्याबद्दल या आंदोलकांनी साधान व्यक्त केलं आहे.
ध्रव राठी प्रकरण काय होतं?
प्रसिद्ध यूट्यूबर ध्रुव राठीच्या व्हिडीओमधील एक क्लिप व्हॉटसअप ग्रुपमध्ये ब्रॉडकास्ट केल्याने केल्याने वसईतील वकील अॅड. आदेश बनसोडे यांच्याविरोधात 28 मे रोजी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मतदारांना प्रभावित करून पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचा तसेच आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 20 मे रोजी मतदानाच्या दिवशी बनसोडे यांनी ध्रुव राठीचा व्हिडीओ ‘बार असोसिएशन ऑफ वसई’ या व्हॉटसअप ग्रुपवर टाकला होता. मतदानाला जाण्यापूर्वी हा व्हिडीओ जरूर पहा असा मेसेज त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताना लिहिला होता. त्याविरोधात या ग्रुपमधील मेंबर असलेल्या अॅड. नारायण वाळींजकर यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. उमेदवाराबाबत खोटी माहिती पसरवून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला असा आरोप या तक्रारीत करण्यात आला होता. या तक्रारीवरून माणिकपूर पोलिसांनी बनसोडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.