प्रशांत परदेशी, झी मीडिया धुळे : पती-पत्नीमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरुन भांडणं होत असतात. पण धुळ्यात एका क्षुल्लक कारणावरुन पतीने पत्नीची हत्या केली. धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यात ही घटना घडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकी घटना काय?
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात नटवाडे इथं रामलाल पावरा आणि गीताबाई पावरा हे दाम्पत्य रहातात. पती रामलाल पावरा याला तपकीरीचं व्यसन होतं. हेच व्यसन गीताबाई पावरा यांच्या मृत्यूचं कारण ठरलं. रामलाल याने गीताबाईकडे तपकीर मागितला. पण गीताबाई हिने तपकीर देण्यास उशीर केला.


तपकीर दिली नाही यामुळे संतापलेल्या रामलाल याने गीताबाई हिच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केला. घाव वर्मी लागल्यामुळे गीताबाई हिचा जागीच मृत्यू झाला.


घटनेची माहिती मिळताच शिरपूर शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गीताबाई पावरा यांच्या माहेरकडील नातेवाईकांना माहिती मिळताच शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. जोपर्यंत गीताबाई हिच्या सासरच्या घरातील सदस्यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात आणत नाहीत तोवर मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भुमिका मयत महिलेच्या नातेवाईकांनी घेतली. 


उपजिल्हा रुग्णालयात शिरपूर पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. आरोपी रामलालला पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.