Crime News : हात बांधलेले, खिशात ST चं तिकीट अन्... प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या
Dhule Crime : शिरपूर तालुक्यातील तरडी शिवारात मक्याच्या शेतामध्ये हात बांधलेल्या अवस्थेतील मृतदेह (Crime News) आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Dhule Police) घटनास्थळी धाव घेतली. आरोपींनी मृतदेहाजवळ कोणताही सबळ पुरावा सोडला नव्हता. मात्र मृतदेहाच्या खिशात एक एसटीचे तिकीट सापडलं आणि या हत्येचा उलघडा झाला.
Crime News : स्वतःच्याच मुलीकडे वाईट नजरेने पाहणाऱ्या बापाची पत्नीने प्रियकराच्या साथीने हत्या केल्याचा प्रकार धुळ्यात (Dhule News) घडलाय. कोणताही सबळ पुरावा नसताना पोलिसांनी (Dhule Police) अचूक तपास करत आरोपींना अटक केलीय. पोलिसांनी याप्रकरणी मयत व्यक्तीच्या पत्नीसोबत आणखी तिघांना अटक केली आहे. दरम्यान या घटनेने धुळ्यात एकच खळबळ उडाली आहे.
मध्य प्रदेश, गुजरातपर्यंत पोहोचला तपास
धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील तरडी शिवारात मक्याच्या शेतामध्ये एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाचे हात ओढणीच्या साहाय्याने बांधण्यात आले होते. त्यामुळे या तरुणाचा खून झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले होते. आरोपींनी तरुणाच्या मृतदेहाजवळ कोणत्याही प्रकारचा पुरावा ठेवला नव्हता. मात्र त्याच्या खिशामध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे एक तिकिट होते. त्याच्या मदतीने पोलिसांनी तपास सुरु केला. त्यानंतर हा तपास मध्य प्रदेश आणि गुजरातपर्यंत जाऊन पोहोचला.
STच्या तिकीटावरुन लावला मारेकऱ्याचा शोध
दुसरीकडे मृतदेह सापडल्यानंतर थाळनेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खुनाचा तपास धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सुरु केला. मृत तरुणाच्या अंगठ्याजवळ केवळ मुकेश असे लिहील्याचे पोलिसांना आढळून आले होते. तसेच त्याच्या खिशात आढळलेल्या तिकीटाच्या आधारे त्याने
चोपडा ते शिरपूर असा प्रवास केल्याचे आढळले. मात्र तिकीटावरील तारखेच्या आधारे पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता मृत तरुणासोबत एक महिलादेखील बसमध्ये त्याच्यासोबत चढल्याचे दिसून आले.
मुलीवर वाईट नजर असल्याचा संशय
तपासानंतर त्या महिलेला ताब्यात घेतल्यानंतर ती मृत तरुणाची पत्नी असल्याचे समोर आले. मृताच्या पत्नीने आणखी तिघांच्या साथीने मुकेश बारेला याची हत्या केल्याची कबुली दिली. मुकेश बारेला हा गेल्या दोन वर्षांपासून पत्नीपासून वेगळा राहत होता. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा होता. दोन्ही मुले मुकेशकडेच होती. मुकेशची पत्नी ही सुशील पावरा नावाच्या व्यक्तीसोबत राहत होती. मुकेश मुलीकडे चुकीच्या नजरेने पाहत असल्याचा संशय त्याच्या पत्नीला होता. त्यामुळे तिने प्रियकराच्या साथीने मुकेशची हत्या करण्याचा कट रचला.
मुकेशच्या पत्नीने प्रियकर सुशील पावरा, दिनेश उर्फ गोल्या वसुदेव कोळी आणि जितू उर्फ तुंगऱ्या लकडे पावरा यांच्या मदतीने त्याची हत्या केली आणि मृतदेह शिरपूर तालुक्यातील तरडी शिवारात टाकून दिला. मुकेशच्या पत्नीने हत्येची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी इतर आरोपींना गुजरातच्या पोरबंदर येथून अटक केली आहे.