`मम्मी-पप्पा सॉरी...` चिठ्ठी लिहित धुळ्यात विद्यार्थ्यानीने वसतीगृहातच संपवलं आयुष्य
अगदी छोट्या-छोट्या कारणावरुन तरुणांमध्ये आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढलं आहे. धुळ्यात विधी महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचललं. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : जिल्ह्यातील विधी महाविद्यालयातील (Law College) एका विद्यार्थीनीने (Student) वसतिगृहातील (Hostel) खोलीतच गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येपूर्वी या विद्यार्थिनीने एक चिठ्ठी लिहिली असून यात तीने आई वडिलांची माफी मागितली आहे. भारती असं या विद्यार्थिनीचं नाव असून तीने इतकं टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. दोन महिन्यांपूर्वीच भारतीने वसतीगृहात प्रवेश घेतला होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात भारती प्रथम वर्ष एलएलबीचे शिक्षण घेत होती. 10 एप्रिलला ती दातर्ती इथून वसतिगृहात परतली होती. तिची मैत्रीण गावाला गेल्याने ती दोन दिवसांपासून होस्टेलच्या रूममध्ये एकटीच होती. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास भारतीची अन्य एक मैत्रीण भारतीला बोलवण्यासाठी गेली. पण तिच्या रुमचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे मैत्रिणीने खिडकीतून खोलीत डोकावून पाहिलं असता तिच्या पायाखालची जमीन सरकली. भारतीने दोरीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेतला होता.
याबाबत वसतिगृहाच्या अधीक्षकांना तात्काळ माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलिस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी खोलीचा दरवाजा तोडून भारतीचा मृतदेह खाली उतरवला. आत्महत्येपूर्वी भारतीने 'मम्मी-पप्पा सॉरीच अशी सुसाईड नोट लिहून ठेवल्याचे पोलिसांना आढळले. याबाबत देवूपर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
इंदूरमध्ये विद्यार्थिनीची आत्महत्या
दरम्यान, इंदूरमध्येही अशीच एक घटना समोर आली आहे. हर्षिता शिंदे असं या विद्यार्थिनीचं नाव होतं, पेपर चांगले गेले नसल्याने ती तणावात होती. हर्षिता इंदूरमधल्या भंवरकुआ इथल्या एका खासगी वसतीगृहात राहात होती. सोमवारी रात्री ती आपल्या मैत्रिणींना भेटली आणि आपल्या रुमवर गेली. काही वेळाने तिच्या मैत्रीणी तिच्या रुमवर आल्या. पण हर्षिताने बराच वेळ दरवाजा न उघडल्याने त्यांनी वसतीगृहाच्या वॉर्डनला याची माहिती दिली. त्यानंतर रुमचा दरवाजा तोडला असता हर्षिताने गळफास घेतल्याचं आढळलं.
याबाबतीच माहिती पोलिसांनी देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत तपास सुरु केला. त्यांना हर्षिताच्या रुमवर सुसायड नोट आढळली. ज्यात हर्षिताने आपल्याला पेपर चांगले गेले नसल्याचं म्हटलं होतं. यासाठी तीने आई-वडिलांची माफी मागत टोकाचं पाऊल उचललं.