एक गाव 12 भानगडी! सरपंचपदासाठी अपहरणनाट्य
सिनेस्टाईल अपहरण नाट्य या ग्रामपंचायत निवडणुकीत पाहायला मिळालं आहे.
धुळे: गावातच राजकारण फार असं नेहमी बोललं जातं. ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी किती टोकाची भूमिका घेतली जाते याचं उदाहरण धुळे जिल्ह्यातील साकवद गावात समोर आले आहे. सिनेस्टाईल अपहरण नाट्य या ग्रामपंचायत निवडणुकीत पाहायला मिळालं आहे. हा नेमका प्रकार वाचला तर तुम्हाला काही क्षणांसाठी बिन कामाचा नवरा चित्रपटातील शेवटचं सीन आठवल्याशिवाय राहणार नाही.
गावात राजकारण किती टोकाचं होतं याचं उदाहरण धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातल्या साकवद गावात समोर आलंय. ग्रामपंचायतीचे निकाल लागले. दोन्ही पॅनलला ३ -३ जागा मिळाल्या. सरपंचपदाची निवडणूक जाहीर झाली आणि एका गटाने आपलाच सरपंच कसा बसेल यासाठी अपहरण नाट्य रचले.
दत्तू धना भिल या ग्रामपंचायत सदस्याचे अपहरण करण्यात आले. दत्तू हे आपल्या कुटुंबासोबत शिरपूर येथे बाजारासाठी आले असतांना त्यांचे अपहरण करण्यात आले. सरपंचपदाची निवड झाली. विरोधी पार्टीचा सरपंच झाला. तरी त्यांची सुटका होत नव्हती. शेवटी दत्तू यांनी बिडीचा बहाणा करून खंबाळेच्या जंगलातून पळ काढला.
या प्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दत्तू भिल गरीब आहेत. त्यातही जातीचा अडसर त्यांना अधिक कमकुवत तर ठरवत नाही ना अशी चर्चा आहे.
नाशिक जिल्ह्यात एका गावात ग्रामपंचायत निवडणुकीतील लिलाव समोर आला होता. निवडणुकीत लोकशाही मुल्य कशी पायदळी तुडवली जातात याचं आणखी एक उदाहरण साकवद गावाच्या निमित्ताने धुळे जिल्ह्यातही पहायला मिळालंय. आत निवडणूक आयोग काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून आहे.