Pune Lok Sabha Election : पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची चाचपणी, या नावांची चर्चा
Pune Lok Sabha Election : आता पुण्यात लोकसभा पोटनिवडणुकीची चर्चा सुरु झाली आहे. खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे. भाजप उमेदवारीसाठी संभाव्य उमेदवार म्हणून अनेक नावांची चर्चा सुरु झाली आहे. भाजपने यासंदर्भात एका संस्थेमार्फत सर्वेक्षणही केल्याची माहिती आहे.
Pune Lok Sabha Election : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर आता पुण्यात लोकसभा पोटनिवडणुकीची चर्चा सुरु झाली आहे. भाजप आणि काँग्रेसने संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. भाजपने यासंदर्भात एका संस्थेमार्फत सर्वेक्षणही केल्याची माहिती आहे. त्याबाबत थेट केंद्रातून हालचाली सुरु आहेत. दरम्यान, भाजपबरोबरच महाविकास आघाडीनेही लोकसभा उमेदवार निवडीसाठी तयारी सुरु केली आहे. पुणे लोकसभेची ही जागा काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपमध्ये मोठी स्पर्धा दिसून येत आहे. काहीनी तर चक्क आधीच बॅनरबाजीही केली होती. या जागेसाठी भाजपमधून एकूण पाच जण स्पर्धेत आहेत. तर काँग्रेसमधून दोन जणांच्या नावाची चर्चा सुरु आहे. त्यामुळे भाजपमधून कुणाला आणि काँग्रेसमधून कुणाला उमेदवारी दिली जातेय, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. मात्र, भाजपचा ही निवडणूक बिनविरोध करण्यावर भर दिसत आहे. मात्र, कसबा पेठ विधानसभा निवडणुकीचा अनुभव पाहता भाजपने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.
भाजपकडून यांच्या नावाची जोरदार चर्चा
भाजप उमेदवारीसाठी संभाव्य उमेदवार म्हणून दिवंगत खासदार बापट यांच्या सून स्वरदा बापट, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे यांच्या नावाची चर्चा आहेत. त्यातच आता पर्वती विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेल्या माधुरी मिसाळ यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो, असं अंतर्गत गोटातून बोलले जात आहे.
भाजपकडून उमेदवार निवडीसाठी सावध भूमिका
बापट यांच्या घरातील व्यक्ती, लोकप्रिय चेहरा, अनुभवी नेतृत्व की कसब्यातील पराभवाचा अनुभव यापैकी नेमका कोणता निकष भाजपकडून उमेदवार निवडीसाठी लावला जातो हे पाहणं औत्सुक्याचं आहे. दरम्यान लोकसभेसाठी काँग्रेसकडून कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनाच मैदानात उतरवले जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कांग्रेसमध्ये अजून त्याबाबतच्या हालचालींना वेग आलेला नाही.
पुण्यातील कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाचा मोठा धक्का बसला होता. त्यामुळे यावेळी पुणे लोकसभा निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून भाजप दक्ष आहे. भाजप सावधगिरी बाळगून उमेदवार उभा करणार हे स्पष्ट आहे. दरम्यान, पुणे लोकसभेची जागा रिक्त झाल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग लवकरच या निवडणुकीची घोषणा करु शकतो, अशी शक्यता आहे.