शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर :कोरोनामुळे धास्तावलेल्या ग्रामीण भागातील जनतेची चिंता वाढवणारी बातमी.  लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील बोळेगाव येथे विद्यमान बरमदे हा भिवंडी, मुंबईहुन एका वाहनाने दोन दिवसापूर्वी आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून गावातील वैभव पाटील, शत्रुघ्न पाटील आणि इतरांनी विद्यमान  बरमदे  याला गावात गाडी उभी करू नका, कोरोनाच्या लक्षणांची तपासणी करा आणि शेतात राहण्याचा सल्ला दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचा राग राग मनात धरून विद्यमान बरमदे आणि शेजारील चांदोरी गावातील ०५ साथीदारांनी मिळून याचा बदला घेण्याचे ठरविले. त्यानुसार पहाटे ०३ च्या सुमारास बोळेगाव येथील घराच्या अंगणात झोपलेल्या शहाजी किशन पाटील ( वय-५०) आणि वैभव बालाजी पाटील ( वय ३०) यांच्यासहीत पाच जणांवर सशस्त्र हल्ला केला. ज्यात लोखंडी रॉड, चाकू आणि लाठ्या-काठ्यांचा वापर केला. या  हल्ल्यात शहाजी पाटील आणि वैभव पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर श्रीधर पाटील, सागर पाटील आणि इतर एक असे तिघेजण जखमी झाले.


झोपेत असणाऱ्या पाच जणांवर हल्ला करून आरोपी विद्यमान बरमदे, अविनाश माने, गणेश माने, दत्तू माने, भरत सोळुंके आणि इतर एक असे सहा जण फरार झाले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवीत सर्वच आरोपीना अटक केली आहे. त्यांच्यावर कासारशिरसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान कोरोनाच्या काळात अशा पद्धतीने निर्घृण हत्या करण्याची ही राज्यातील एकमेव घटना आहे. त्यामुळे मुंबई-पुण्याहून येणाऱ्यांनी आप-आपल्या गावी जाताना योग्य ती दक्षता घेऊनच गावात जावं का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय.