ज्ञानेश्वर पतंगे, झी मीडिया, धाराशिव : धाराशिव (Dharashiv News) जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील शिराढोण गावात झेंडा लावल्याच्या कारणावरून दोन गटात जोरदार राडा झालाय. मंगळवारी रात्री उशिरा हा वाद झाला असून यामध्ये तुफान दगडफेक (stone pelting) करण्यात आली. या दगडफेकीत 3 ते 4 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी देखील जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दगडफेकीनंतर गावात सध्या तणावाचे वातावरण झाले असून संचारबंदी (curfew) लागू करण्यात आली आहे. या घटनेनंतर गावात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिराढोण गावात झेंडा लावण्यावरुन यापूर्वही अनेक वेळा तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर मंगळवारी पुन्हा एकदा झेंडा लावण्यावरुन दोन गटांमध्ये मोठा वाद झाला. यानंतर दोन्ही गटाकडून दगडफेक करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांवर दगडफेक झाल्याने कारवाई करण्यास सुरुवात झाली. पोलिसांनी आतापर्यंत 30 पेक्षा अधिक जणांना ताब्यात घेतले असून अद्याप अटक सत्र सुरूच असल्याची माहिती समोर आली आहे.


 या घटनेनंतर जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी घटनास्थळी दाखल झाले आहेत. यावेळी गावातील नागरिकांनी शांतता पाळावी असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी केले आहे. 


दरम्यान, याआधीही झेंडा काढण्याच्या वादातून झालेल्या गावकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. गेल्या 40 वर्षापासून शिराढोण  येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात फडकत असलेला झेंडा काढण्याचा निर्णय कळंब तालुका प्रशासनाने गेल्या वर्षी घेतला होता. यानंतर शिरढोणमधील गावकऱ्यांनी सामुदायिक आत्मदहनाचा इशारा दिला होता. झेंडा काढू न देण्याचा ठराव 27 जून 2022च्या ग्रामसभेत घेण्यात आला. मात्र त्यानंतरही कळंब तालुका प्रशासनाने हा झेंडा काढण्याचे आदेश दिल्यानंतर गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरु केले होते.