मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर अनेक जण अडकलेत. कोणी उपाशी राहू नये म्हणून मजूर, कामगार आणि गरिबांना राज्यशासनाच्यावतीने केवळ पाच रुपयांत शिवभोजन उपल्ध करुन देण्यात आले. राज्यात आतापर्यंत ३० लाख ५८ हजार १६५ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. दरम्यान, राज्यात १ मे ते  २८ मे पर्यंत ८३४ शिवभोजन केंद्रातून पाच रुपये प्रति थाळी याप्रमाणे हे शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील  ५२ हजार ४२८ स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे. १ मे ते २८ मे पर्यंत राज्यातील १ कोटी ४८ लाख ८० हजार ९९ शिधापत्रिका धारकांना ७० लाख ७९ हजार ८९० क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले  आहे. राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहे.  या लाभार्थ्यांना ५२ हजार ४२८ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. 



राज्यात या योजनेमधून सुमारे २० लाख २६ हजार ६९७ क्विंटल गहू, १५ लाख ५७ हजार २७५ क्विंटल तांदूळ, तर  २१ हजार ६१४  क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात  अडकलेल्या सुमारे ४ लाख २२ हजार ४५२ शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.


प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जूनपर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. ४ मे पासून एकूण १ कोटी २० लाख ५१ हजार ८८१ रेशनकार्ड ला मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्ड वरील ५ कोटी ४३ लाख १४ हजार १२४ लोकसंख्येला २७ लाख १५ हजार ७१० क्विंटल तांदुळाचे वाटप झाले आहे.  


राज्य शासनाने कोविड-१९ संकटावरील उपाययोजनेसाठी ३ कोटी ०८ लाख ४४ हजार ०७६  एपीएल केसरी लाभार्थ्यांना मे व जून २०२० या २ महिन्यासाठी प्रती व्यक्ती ५ किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू ८ रुपये प्रति किलो व तांदूळ १२ रुपये प्रति किलो) देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे वाटप २४ एप्रिल २०२० पासून सुरू होऊन आतापर्यंत ७ लाख ८० हजार २१० क्विंटल धान्याचे वाटप केले आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रती रेशनकार्ड १ किलो मोफत डाळ (तूर किंवा चणा डाळ) देण्याची तरतूद आहे. या योजनेतून सुमारे ६४ हजार ९४४  क्विंटल डाळीचे वाटप केले आहे.



 तसेच टंचाई भासवून चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिकाधारकांना मे व जून २०२० या दोन महिन्यांच्या कालावधीकरिता प्रतिव्यक्ती प्रतिमाह पाच किलो मोफत तांदूळ वितरण करण्यात येत आहे.