फटाके फोडताना काळजी घ्या, पुण्यात लहान मुलासोबत काय झालं वाचा
फटाके फोडताना अनेक मुलं जखमी झाल्याची नोंद, काही ठिकाणी आग लागल्याची घटना
Diwali 2022 : पुणे (Pune) शहरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर शहरात झालेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीने शहरात 17 ठिकाणी आगीच्या घटना घडल्या तर याच रंगबेरंगी फटाक्यांनी (Colorful Crackers) पुण्यातील नऱ्हे भागातील एक मुलगा जखमी झाला आहे. शिवांश अमोल दळवी असं या जखमी झालेल्या मुलाचं नाव आहे. काल रात्री दहा वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.जखमी मुलाची प्रकृती आता ठिक असून पण इतर मुलांनी काळजी घ्यावी असं जखमी मुलाच्या नातेवाईकांकडून आवाहन करण्यात आलं आहे.
लक्ष्मीपूजन झाल्या नंतर शहरात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. शिवांश हा रात्री घराच्या बाहेर फटाके फोडत असताना रंगबेरंगी पाऊस पडणारा फटाका फोडत होता. पण अचानक फटाका फुटल्याने शिवांशचा चेहरा भाजला. त्याला तात्काळ उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आलं.
संभाजीनगरमध्ये 16 जण जखमी
फटाके फोडताना संभाजीनगर मध्ये 16 मुलांच्या डोळ्याला आणि चेहऱ्याला इजा झालीय. फटाके फोडताना त्यांचे डोळे आणि चेहरा भाजला असल्याची माहिती आहे. या मुलांवर संभाजीनगरच्या शासकीय घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून काही मुलांना रुग्णालयातून सोडलं असल्याची माहिती आहे. इतर मुलांनी काळजी घ्यावी असं जखमी मुलाच्या नातेवाईकांकडून आवाहन करण्यात आलं आहे.
पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा
गेल्या काही वर्षापासून सातत्याने पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करावी यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. तसंच फटाके मुक्त दिवाळी साठी अनेक संस्था संघटनांच्या माध्यमातून जनजागृती देखील केली जाते. पण अस असल तरी अश्या या फटाक्यांच्या आतिषबाजीने मोठ्या प्रमाणावर आगीच्या घटना घडत आहे. फटाके फोडताना काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केलं आहे.
फटाक्यांचा आवाज वाढला
मुंबईसह राज्यभरातच यंदा दिवाळी दणक्यात साजरी करण्यात आली. पण त्याचवेळी फटाक्यांचा आवाजही जोरात होता. खासकरुन मुंबईत सर्वाधिक आवाजाची नोंद झालीय. लक्ष्मीपूजनावेळी तर फटाक्यांचा सर्वाधिक आवाज होता. मरिन ड्राईव्हवर 109 डेसिबल्सची पातळी नोंदवण्यात आली. फटाक्यांमुळे वायू प्रदुषणातही मोठी वाढ झाल्याचं दिसून आलंय. त्यामुळे दृश्यमानता कमी झाली असून सर्वत्र धुरकट दिसतंय. पुण्यातही वायू प्रदुषणात मोठी वाढ झाली असून गेल्या 3 वर्षांतल्या आकडेवारीचा उच्चांक गाठलाय. अतिसूक्ष्म कणांची पातळी 210 वर नोंदवण्यात आली. 200 ते 300 यामधली आकडेवारी वाईट समजली जाते.