Mumbai Real Estate Sales: सणवार म्हटल्यावर खरेदी आलीच. त्यातही दिवाळी, दसऱ्याच्या मुहूर्तावर केवळ दगिने आणि वस्तू नाही तर घर, जमीन किंवा संपत्तीसंदर्भातील खरेदी करण्याचा ट्रेण्ड दिसून येतो. यंदाच्या वर्षीही प्रॉपर्टी बाजारामध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये घरांच्या विक्रीमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसत आहे. सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये घरांच्या विक्रीत लक्षणीय वाढ दिसून येत आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये केवळ 9 हजार 111 घरांची विक्री झाली होती. सप्टेंबरच्या घरविक्रीमधून मुद्रांक शुल्क वसुलीच्या रूपाने राज्य सरकारला 876 कोटी रुपये महसूल मिळालेला. ऑक्टोबरमध्ये विक्री झालेल्या घरांच्या संख्येत वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात तब्बल 12 हजार 832  घरांची विक्री झाली आहे. या घरविक्रीतून राज्य सरकारच्या तिजोरीत 1194 कोटी रुपयांची भर पडली आहे.


पितृ पंधरावडा असल्याने बसला फटका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चालू वर्षात बांधकाम व्यवसायात तेजी दिसून येत असल्यामुळे या वर्षात घरविक्रीचे समाधानकारक आकडे दिसत आहेत. सप्टेंबर वगळता जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान घरविक्रीने सातत्याने 10 हजाराचा टप्पा पार केला आहे. मार्च महिन्यामध्ये 14 हजारांहून अधिक घरांची विक्री झाली होती आणि यातून 1122 कोटी रुपये महसूल मिळाला होता. या पाठोपाठ जुलै महिन्यामध्ये 12 हजारांहून अधिक घराची विक्री झाली होती. सप्टेंबर महिन्यामध्ये सर्वात कमी म्हणजेच 9 हजार 111 घरांची विक्री झाली होती. सप्टेंबर महिन्यामध्ये पितृ पंधरावडा असल्याने त्याचा फटका घरविक्रीला बसला. या काळात घर खरेदी वा इतर कोणतेही महत्त्वाचे कामं न करण्याची मानसिकता आहे. त्यामुळेच सप्टेंबरमध्ये घरविक्री 10 हजारांपर्यंतही पोहचली नाही. मात्र सप्टेंबरमध्ये पडलेला हा खड्डा ऑक्टोबरमध्ये भरुन निघेल असा विश्वास आधीपासूनच व्यक्त केला जात होता. ऑक्टोबरमध्ये दसरा आणि दिवाळीमुळे घरांच्या विक्रीत मोठी वाढ होईल, असा विश्वास बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केलेला. त्यांचा हा विश्वास खरा ठरल्याचं नव्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.


भरघोस सवलतीमुळे उत्तम प्रतिसाद


घर खरेदी, गृहनोंदणी यासारखे व्यवहार करण्याकडे दसरा – दिवाळीच्या काळात ग्राहकांचा कल दिसून येतो. त्यामुळे या काळात घरविक्रीमध्ये वाढ होते. ही बाब लक्षात घेता सणासुदीच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बिल्डर्सकडून विविध सवलती दिल्या जातात. त्यानुसार यंदाही दसरा आणि दिवाळीच्या काळात बिल्डर्सने भरघोस सवलती जाहीर केलेल्या. परिणामी, मुंबईतील घरविक्रीत ऑक्टोबरमध्ये वाढ झाली. ऑक्टोबरमध्ये 12 हजार 833 घरांची विक्री झाली आहे. राज्य सरकारला या घरविक्रीतून 1195 कोटी रुपये महसूल मिळाला आहे. यंदाच्या महिन्यात मिळालेला महसूल हा 2024 मधील आतापर्यंतचा हा सर्वाधिक महसूल आहे. मार्चमध्ये विक्रमी 14 हजार 149 घरांची विक्री झाली होती. मात्र यातून राज्य सरकारच्या तिजोरीत केवळ 1122 कोटी रुपये जमा झाले होते.