स्मशानभूमीत साजरी झाली दिवाळी!
सगळीकडे दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय.
प्रताप नाईक, झी मीडीया
कोल्हापूऱ : सगळीकडे दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. मात्र एका ठिकाणी अगदी वेगळी दिवाळी साजरी केली जाते. ज्या ठिकाणी सहसा कोणी जात नाही आणि गेलं तरी आनंद व्यक्त केला जाता नाही. ही आहे कोल्हापुरातील एक अनोखी दिवाळी.
स्मशान भूमीतले हे फलक जीवनाचं गमक सांगत असले तरीही स्मशान भूमीत प्रवेश करणारं प्रत्येक मन हे थोडंतरी बिथरतंच. कारण या ठिकाणी कोणी आनंद व्यक्त करण्यासाठी जातं नाही. आणि म्हणूनच इथला कर्मचारीही स्वत:च्या आयुष्यात कितीही आनंदी असला तरी रोज तो दुस-याच्या दु:खासाठी जगत असतो. मात्र कोल्हापुरातील स्मशानभूमीत काही काळ आनंदाचं वातावरण दिसून आलं, निमित्त होतं ते प्रजासत्ताक सामाजिक संस्थेच्या वतीने स्मशान भूमीतील कर्मचा-यांसाठी दिवाळी साजरी करण्याचं.
गेले दोन वर्ष हा उपक्रम राबवणा-या या संस्थेच्यावतीने कर्मचा-यांना काही भेटवस्तूंचं वाटपही करण्यात आलं. माणसाच्या मृत्यूनंतर ज्या ठिकाणी केवळ चिता जळते..त्या ठिकाणी दिवाळीनिमित्त पणती लावण्याचं काम करणाऱ्या या संस्थेचं कौतुक करावं तितकं कमी आहे...