एमबीबीएसची तयारी करताय तर फसणार नाही याची काळजी घ्या...
राज्यातील एमबीबीएस अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबवणाऱ्या डीएमईआर म्हणजेच वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाची बनावट वेबसाइट तयार करण्यात आलीय. या डुप्लिकेट वेबसाइटविरोधात सायबर सेलकडं तक्रार करण्यात आलीय.
योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : राज्यातील एमबीबीएस अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबवणाऱ्या डीएमईआर म्हणजेच वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाची बनावट वेबसाइट तयार करण्यात आलीय. या डुप्लिकेट वेबसाइटविरोधात सायबर सेलकडं तक्रार करण्यात आलीय.
कारण त्यासाठी तुम्हाला डीएमईआरच्या म्हणजे वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या वेबसाइटवर जावं लागेल... पण ती वेबसाइटच बोगस असेल तर...? हो, असं घडलंय... 'डीएमईआर डॉट ओआरजी' ही अधिकृत वेबसाइट... पण अगदी त्याचसारखी... सेम टू सेम... 'डीएमईआरजीओव्ही डॉट ओआरजी' असं नामसाधर्म्य असलेली बनावट वेबसाइट कुणीतरी तयार केलीय. या विरोधात डीएमईआरनं मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडं अधिकृत तक्रार केल्याची माहिती डीएमईआरचे सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी दिलीय.
वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी तसंच वैद्यकीय विभागातल्या भरतीसाठी या वेबसाइटचा प्रामुख्यानं वापर केला जातो. नव्या डुप्लिकेट वेबसाइटच्या आधारे नोकरी देण्याचं आमीष दाखवून अनेकांना लाखो रूपयांचा गंडा घालण्यात आलाय, असंही डीएमईआर संचालकांनी स्पष्ट केलंय.
सगळीकडं डिजीटलचे वारे वाहत असताना, अधिकृत सरकारी वेबसाइटचीच अशी बोगस आवृत्ती निघावी... आणि त्यामाध्यमातून लाखोंचा गंडा घातला जावा, हा सगळाच प्रकार धक्कादायक आहे. याआधी नाशिकच्या आरटीओमध्ये वाहन पडताळणीची बोगस प्रमाणपत्रं वेबसाइटवरून देण्यात आली होती. तसंच आदिवासी विकास विभागाची बोगस वेबसाइट तयार करून अनेकांना नोकरी देण्याच्या आमिषानं फसवण्यात आलं होतं. आता सरकारी वेबसाइटच सुरक्षित नसतील तर सामान्य जनतेनं विश्वास ठेवायचा तरी कुणावर, असा प्रश्न उपस्थित होतोय.