नागपूर: अर्थव्यवस्थेत मंदी असल्याची चर्चा करून वातावरण नकारात्मक करू नका, असे आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. ते मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात संपन्न झालेल्या विजयादशमी मेळाव्यात बोलत होते. या भाषणात मोहन भागवत यांनी अनुच्छेद ३७०,  झुंडबळी आणि भारतीय अर्थव्यवस्था या मुद्द्यांवर सविस्तरपणे संघाची भूमिका मांडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही काळापासून भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग मंदावल्यामुळे अर्थव्यवस्थेत चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे मोदी सरकार अडचणीत सापडले आहे. या पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोदी सरकारची पाठराखण केली. देशाचा विकास होत आहे. परंतु, ठराविक काळानंतर अर्थव्यवस्थेची गती ही मंदावत असते. मी याबाबत आर्थिक जाणकारांशी चर्चा केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, अर्थव्यवस्थेचा विकासदर शून्य टक्क्याच्या खाली गेला तर ती मंदी मानली जाते. परंतु, भारतीय अर्थव्यवस्थेचा सध्याचा विकासदर पाच टक्के इतका आहे. 


त्यामुळे उगाच मंदीच्या चर्चा करून वातावरण नकारात्मक करू नका. सरकारने यासाठी उपाययोजना केल्या आहेत. मात्र, एकट्या सरकारच्या उपाययोजनांनी काही होणार नाही. अमेरिका-चीन यांच्यातील व्यापारयुद्धासारख्या बाह्य गोष्टींबाबत सरकार काहीही करू शकत नाही, असे भागवत यांनी सांगितले. 


यावेळी मोहन भागवत यांनी स्वदेशी गोष्टींच्या निर्मितीवर भर देण्याचा सल्ला दिला. स्वदेशी म्हणजे जगाशी संबंध तोडणे, ही चुकीची धारणा आहे. मात्र, ज्या गोष्टींची निर्मिती आपल्या देशात होऊ शकते, त्या दुसऱ्या देशांकडून आयात का कराव्यात? आपल्या अटींवर इतर देशांशी व्यापार करणे, ही स्वदेशीची खरी व्याख्या असल्याचे त्यांनी म्हटले. प्रचलित अर्थव्यवस्थेतील जीडीपीसारखी मानके अपूर्ण आहेत. त्यासाठी स्वदेशीवर आधारित नव्या धोरणांचा अवलंब करण्याची गरज आहे. मात्र, स्वदेशी व्यवस्थेचा अंगीकार करण्यासाठी प्रचलित अर्थव्यवस्थेत काही मुलभूत बदल करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.