मुंबई : डॉक्टरांवर होणाऱ्या मारहाणीचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाहीये. राज्यात पुन्हा एकदा डॉक्टरला मारहाण करण्यात आली आहे. अलिबागमध्ये एका डॉक्टरला जबर मारहाण करण्यात आली आहे. अलिबागच्या कोविड सेंटरमध्ये ही घटना घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलिबागच्या कोविड सेंटरमधील ही घटना असून रूग्णानेच डॉक्टरला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. डॉ. स्वप्नदीप थळे असं त्यांचं नाव असून ते गंभीर जखमी झाले आहे. डॉ. थळे यांच्यावर सध्या जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.


रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास डॉ. स्वप्नदीप थळे हे कोविड सेंटरमध्ये राऊंडसाठी गेले होते. यावेळी एका रुग्णाने सलाईनचा स्टँड त्यांच्या डोक्यात घातला. दरम्यान या रूग्णाने डॉक्टरांना का मारहाण केलीये मागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या मारहाणीमध्ये डॉ. थळे यांच्या एका डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.


यासंदर्भात झी 24 तासशी बोलताना महाराष्ट्र मेडिकल काऊंसिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे म्हणाले, सध्या डॉक्टरांना मारहाण होण्याच्या घटना सर्रासपणे होताना दिसतात. यासाठी सरकारने कडक अशी पावलं उचलली पाहिजे. मुख्य म्हणजे डॉक्टर मारहाणीसाठी असलेल्या कायद्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी व्हायला पाहिजे.


डॉ. उत्तुरे पुढे म्हणाले, "या कायद्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी झाली की लोकं याबाबत जागृत होती. याअंतर्गत होणाऱ्या शिक्षेची त्यांना जाण होईल. आणि यामुळे डॉक्टरांवर होणारे हल्ले कमी होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे हा कायदा सेंट्रल लॉमध्ये आणावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून आयएमएकडून केली जातेय."