पुणे : शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या मागे कुटुंबाचं कसं होणार असा प्रश्न उपस्थित राहतो. पण भोई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी धावून आले. निमित्त होतं मुलीचं लग्न....  डॉ. भोई यांनी मुलीच्या विवाहानिमित्त नांदेड येथील अर्धापूरमधील लक्ष्मी साखरे यांना घर बांधून देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचं सर्वचं स्तरातून कौतुक होत आहे. मुलीचं लग्न थाटात न करता डॉ. भोई यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉ. मिलिंद भोई यांची मुलगी गायत्री भोई हिचा विवाह हृतिकेश गोसावी यांच्यासोबत होत आहे. गोसावी कुटुंबाने देखील भोई यांच्या निर्णयाचं स्वागत करत सकारात्मक प्रतिसाद दिला.  


'जेव्हा साखरे कुटुंब त्यांच्या नव्या घरी राहायला जाईल, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर असणारा आनंद माझ्यासाठी लाखमोलाचा असेल... 'अशी भावना डॉ. भोई यांनी व्यक्त केली.


महत्त्वाचं म्हणजे अर्धापूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे पालकत्व पुण्यातील भोई प्रतिष्ठानाने स्वीकारली आहे. शेतकऱ्या आत्महत्येनंतर कठीण परिस्थितीचा सामना करत लक्ष्मी साखरे पुन्हा मोठ्या जिद्दीने आयुष्य जगत आहेत. 


दिवसभर शेतात काम  करून त्या संध्याकाळी मुलांचा आभ्यास घेत असतात. महत्त्वाचं म्हणजे सर्व काही सांभाळून लक्ष्मी साखरे यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. यामध्ये त्यांना उत्तम यश देखील मिळालं आहे.