आशीष अम्बाडे , झी मीडिया , गडचिरोली  : गडचिरोलीमध्ये जिल्हापरिषदेच्या कर्मचा-याला ह्रदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात दाखल केलेल्या या कर्मचा-याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. त्यानंतर शवगृहात बघण्यासाठी गेलेल्या नातेवाईकांना कर्मचारी जिवंत आढळला. यामुळे डॉक्टरांच्या कार्यशैलीवरची प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गडचिरोली शहरातील कॅम्प भागात वास्तव्याला असलेले प्रभू मारबते यांना छातीत दुखू लागल्याने तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी कार्यरत असलेल्या डॉक्टरांनी मारबते याना मृत  घोषित करत शवाची शवविच्छेदनासाठी शवगृहात रवानगी केली. 


ही वार्ता कळताच मारबते यांच्या नातेवाईकांनी रूग्णालयात धाव घेतली. काही निकटचे लोक त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी शवगृहात पोचले. 


तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. मारबते जिवंत असून त्यांच्या तोंडातून लाळ बाहेर पडत होती. आरडाओरडा करत मारबते यांना शवगृहातून उपचार कक्षात आणले गेले. मात्र दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तब्बल २ तास जिवंत असलेल्या रुग्णावर डॉक्टरच्या निष्काळजीपणाने मृत्यू ओढविल्याचा आरोप नातेवाईक आणि परिचितांनी केला आहे. 


दरम्यान या सर्व घटनेचे शल्य चिकित्सकांनी खंडन केले आहे. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील लाखो रुग्णांचा आधार असलेले जिल्हा रुग्णालय विविध सोयींनी युक्त असूनही इथल्या वैद्यकीय अधिका-यांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णालय सतत चर्चेत असते. 


या खळबळजनक प्रकारामुळे आता या रुग्णालयाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने आरोग्य विभाग नक्की काय करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.