`जणू विठ्ठलच रस्ता दाखवत होता,` पंढरपूर वारीत हरवलेल्या कुत्र्याने 250 किमी प्रवास करत गाठलं घर; गावाने केला सत्कार
हरवलेला श्वान घरी परतल्याचं पाहून आनंद झालेल्या जमावाने त्याचा सत्कार करत चक्क रॅली काढली. तसंच त्याच्या सन्मानार्थ गावाला मेजवानाही देण्यात आली.
बेळगामधील यमगर्णी गावात चक्क एका कुत्र्याची हार घालत रॅली काढण्यात आली. इतकंच नाही तर त्याच्या सन्मानार्थ संपूर्ण गावकऱ्यांसाठी मेजवानी ठेवण्यात आली होती. यावेळी संपूर्ण गर्दी श्वानासाठी आनंद साजरा करत होती. तुम्हालाही हे वाचून आश्चर्य वाटलं असेल. या कुत्र्याने नेमकं असं काय काम केलं असा विचार तुम्हीही करत असाल. झालं असं की, हा श्वान हरवला होता. विशेष म्हणजे यानंतरही तो न चुकता आपल्या घरी पोहोचला आणि गावकरी आश्चर्यचकित झाले.
महाराज अशी गावकरी त्याला प्रेमाने हाक मारतात. पंढरपुरात भाविकांच्या गर्दीत तो हरवला होता. पण यानंतरही त्याने आपल्या मालकाचा माग काढला आणि तब्बल 250 किमी प्रवास करत गावात दाखल झाला होता. विशेष म्हणजे त्याला कोणीही मदत केली नव्हती. तो एकटाच प्रवास करत आपल्या घऱी पोहोचला होता. त्याला पाहिल्यानंतर गावकऱ्यांचा विश्वासच बसच नव्हता. प्रत्येकजण हा चमत्कार आहे असंच म्हणत होता.
जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराज आपला मालक कमलेश कुंभार यांच्यासह पंढरपूरच्या वारीत गेला होता. कमलेश कुंभार हे वारकरी असून, दरवर्षी आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. कमलेश कुंभार यांच्यासह महाराजही पंढरपुरात पोहोचला होता.
"महाराजला नेहमी भजन ऐकायला आवडतात. एकदा तो माझ्यासह ज्योतिबा मंदिराच्या पदयात्रेत सहभागी झाला होता," अशी माहिती कमलेश कुंभार यांनी पीटीआयशी बोलताना दिली होती. महाराज तब्बल 250 किमीपर्यंत कमलेश कुंभार यांच्यासह चालत गेला होता.
विठ्ठल मंदिरात दर्शन घेतल्यानंर कमलेश कुंभार बाहेर आले असता महाराज जागेवर नव्हता. त्यांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही लोकांनी त्यांना तो दुसऱ्या लोकांसह गेला असल्याचं सांगितलं. "तरीही मी त्याचा शोध घेतला, पण सापडला नाही. त्यामुळे मला वाटलं लोक खरं सांगत आहेत. तो दुसऱ्या लोकांसोबत गेला असावा. मी 14 जुलैला घरी परतलो," असं कमलेश कुंभार यांनी सांगितलं.
पण दुसऱ्या दिवशी कमलेश कुंभार यांना धक्काच बसला. याचं कारण महाराज घराच्या दरवाजात त्यांच्यासमोर उभा होता. जणू काहीच झालं नसल्यासारखा तो शेपूट हलवत होता. त्याचं पोट भरलेलं आणि व्यस्थित दिसत होता अशी माहिती त्यांनी दिली.
कमलेश कुंभार यांनी आपला आनंद गावकऱ्यांसह साजरा कऱण्याचं ठरवलं. "महाराजने स्वत: रस्ता शोधला हे आश्चर्यापेक्षा कमी नाही. जरी 250 किमीचं अंतर असलं तरी तो व्यवस्थित आला. आम्हाला वाटतं विठ्ठलानेच त्याला रस्ता दाखवला असावा," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.