`आजा दारु पिते है, कल शायद..`, `त्या` एका मेसेजमुळे डोंबिवलीतील Murder Mystery चा उलगडा
Dombivali Murder Mystery: डोंबिवलीमध्ये या 65 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आल्याचं उघड झाल्यानंतर पोलिसांनी संक्षय आल्याने गुन्हा दाखल करुन घेतला आणि तपास सुरु केला.
Dombivali Murder Mystery: डोंबिवलीमधील एका 65 वर्षीय महिलेच्या हत्येचा खुलासा चक्क मेसेजमुळे झाला आहे. पोलिसांनी एका मेसेजच्या आधारे या महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीला बेड्या घातल्या आहेत. विष्णूनगर पोलिसांनी यश विचारे या 28 वर्षीय आरोपीला या प्रकरणामध्ये अटक केली आहे.
कोणाची हत्या झाली?
समोर आलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर रुग्णालयाच्या मागील बाजूला असलेल्या परिसरातील वसंत निवास सोसायटीमधील एका महिलेची हत्या झाली होती. मृत महिलेचं नाव आशा रायकर असं असून ती 65 वर्षांची होती. रायकर यांच्या घराच्या दरवाजाला बाहेरुन कडी लावली होती. शेजाऱ्यांनी दार उघडून आत प्रवेश केला तर त्यांना आशा यांचा मृतदेह आढळून आला. आशा यांचा मृत्यू संशयास्पदरित्या झाल्याची शक्यता असल्याने पोलिसांनी सदर प्रकरणामध्ये शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल करुन घेतला.
चोरीची शक्यता का वाटली?
पोलिसांनी घटनास्थळाची नीट पहाणी केली असता आशा यांच्या गळ्यातील माळ, कानातील कर्णफुले गायब होती. त्यामुळेच आशा यांची हत्या चोरीच्या उद्देशानेच झाल्याची शक्यता लक्षात घेत पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी तपास सुरु करत वसंत निवास सोसायटीच्या आजूबाजूला असलेल्या परिसरामधील सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांनी तपासणी सुरु केली.
त्या एका मेसेजमुळे अटक
या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका तरुणाच्या हलचालींबद्दल पोलिसांना शंका आली. तपास केला असता हा तरुण वसंत निवास सोसायटीत राहणारा यश विचारे असल्याचं स्पष्ट झालं. संशयास्पद हलचालींच्या पार्श्वभूमीवर यशला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. यशच्या मोबाईलमध्ये त्याने त्याच्या मित्राला केलेला एक मेसेज सापडला. "आजा दारु पिते है, कल शायद जमा होना पडेंगा," असं यशने मित्राला सांगितलं होतं. या मेसेजमुळे पोलिसांचा संक्षय अधिक वाढला आणि पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर यशने आपला गुन्हा कबूल करत आपणच चोरीच्या उद्देशाने आशा रायकर यांची हत्या केल्याचं सांगितलं.
हत्या का केली?
तपासामध्ये यशला ऑलाइन क्रिकेट बेटींगचं व्यसन लागलं होतं अशी माहिती समोर आली आहे. तो बेटिंग लोटर 365 या साईटच्या माध्यमातून क्रिकेटवर पैसा लावायचा. यामुळे त्याच्यावर 60 हजार रुपयांचं कर्ज झालं होतं. हे कर्ज फेडण्यासाठी त्याला पैशांची गरज होती. काहीतरी जुगाड करण्याचा विचार करत असतानाच यशला एकट्याच राहणाऱ्या आशा रायकर यांच्या अंगावरील दागिने दिसले आणि त्याने त्यांच्या घरात शिरुन आशा यांची गळा दाबून हत्या करत दागिने चोरले. पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 24 तासांमध्ये गुन्ह्याची उकल करत आरोपीला अटक केली.