रब्बी हंगामासाठी गहू- हरभऱ्याला नवा पर्याय; `या` पिकामुळं शेतकरी होऊ शकतो मालामाल
Maharashtra Agriculture News: शेतकरी शेतात वेगवेगळे प्रयोग करुन पाहत आहेत. वाशिममधील शेतकऱ्यानेही वेगळा प्रयोग करुन बघितला आहे.
Agriculture News in Marathi: शेतकरी आता शेतीलाही एक बिझनेस मॉडेल म्हणून पाहत आहेत. भात, गहू ज्वारी, बाजरी या सारखी पारंपारिक पिकं न घेता आणि शेतकरी आधुनिक शेतीकडे वळत आहेत. गहू आणि हरभऱ्याच्या पिकाला पर्याय म्हणून आता शेतकऱ्यांनी वेगळा पर्याय निवडला आहे. या पिकाला बाजारात चांगला भावदेखील मिळतोय. त्यामुळं पारंपारिक पिकांसोबतच आता शेतकरी दुसऱ्या पर्यायांचाही विचार करत आहेत.
गहू आणि हरभऱ्याच्या पिकाला पर्याय म्हणून वाशिम जिल्ह्यातील शेतकरी सध्या औषधी गुणधर्म असलेल्या चिया पिकाकडे वळाले आहेत. यंदाच्या रब्बी हंगामात अनेक शेतकऱ्यांनी चियाची लागवड केली आहे. या पिकासाठी कोणतेही रासायनिक खत द्यावे लागत नाही, कोणत्याही फवारणीची गरज नाही, वन्यप्राणीही त्याला खात नाहीत त्यामुळे इतर पिकांच्या तुलनेत या पिकाचा उत्पादन खर्च कमी असून दरमाही चांगले उत्पन्न मिळतात.
चियाबीज खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होते. तर फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचनशक्ती वाढते यासारखे अनेक औषधी गुणधर्म या पिकामध्ये आहेत. चिया मूलतः मेक्सिको देशातील पीक असून भारतात उत्तरेकडील राज्यात याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.
वाशिम जिल्ह्यातील भटउमरा येथील पंढरीनाथ इंगोले या शेतकऱ्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी चिया सिड्सला पेऱ्याला अधिक पसंती दिली असून पिकं बहरला आहे. शेतकऱ्याला चांगले उत्पन्न होण्याची अपेक्षा असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
शेतात दरवर्षी हरभरा पिक घेत होतो. मात्र पिकाला मर रोग लागत असल्यामुळं आणि पाहिजे तसं उत्पन्न येत नसल्यामुळं आणि पिकाला भावही मिळत नसल्यामुळं मी चिया या पिकाकडे वळलो. चिया पिकाची माहिती मिळाली या पिकाचे भावही चांगले आहेत आणि उत्पन्नही चांगलं मिळतं. या पिकाला फक्त पाण्याची गरज आहे. तसंच, आत्तापर्यंत पिकाला फक्त पाणी लागते. आत्तापर्यंत पिकावर कधीच फवारणी पण केली नाही. आता पिकाला कळ्या बाहेर पडण्याच्या अवस्थेत हे पिक आहे. पिकाला काय भाव मिळतात हे पाहायला हवं, असं शेतकरी पंढरीनाथ इंगोले यांनी म्हटलं आहे.
मिरची पिकावर रोगांचा प्रादुर्भाव
धुळे जिल्ह्यात मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. मिरचीवर रोग पडल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. आता ही मिरची उपटून फेकून देण्याची वेळ आली आहे. प्रामुख्याने धुळे तालुक्यात असलेल्या मोराने शिवारात शेतकऱ्याचे अधिक नुकसान झाले आहे. मिरची उत्पादन सुरू झाला असताना रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादनावर ही विपरीत परिणाम झालेला आहे. मिरचीची गुणवत्ता ढासळली आहे.