पोलीस पतीकडून चार चाकी गाडीसाठी छळ, विवाहितेची आत्महत्या
लग्न समारंभात १५ लाख रुपये हुंडा देऊनदेखील चार चाकी गाडी घेण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी
लातूर : लग्न झाल्यानंतर अवघ्या पाच महिन्यातच पोलिसाच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे ही घटना घडली आहे. कार खरेदी करण्यासाठी माहेरातून १० लाख रुपये घेऊन येण्याची मागणी सासरच्यांकडून होत होती.
सासरच्या त्रासाला कंटाळून ऐश्वर्या रमण दहिफळे या विवाहितीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
तरुणीचा विवाह ८ मे २०१८ रोजी रमन नाळराव दहिफळे या पोलीस कर्मचाऱ्याशी झाला होता. रमण हा यवतमाळ जिल्ह्यातील बिटरगाव येथे कार्यरत आहे.
लग्न समारंभात १५ लाख रुपये हुंडा देऊनदेखील चार चाकी गाडी घेण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी दहिफळे कुटुंबाकडून होत होती.
ऐश्वर्या माहेरी अहमदपूर येथे परतल्या होत्या. मात्र, त्यानंतरही पतीकडून जीवे मारण्याची धमकी दिली जात होती.
अहमदपूर पोलीस ठाण्यात पती रमन दहिफळ, सासरे माधवराव दहिफळे तसेच अन्य एकाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सर्व आरोपी फरार आहेत.