मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजेंच्या भूमिकांमुळे लोकप्रिय असलेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शिवसेनेचे उपनेते आणि प्रवक्ते असलेल्या कोल्हेंनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करुन, जाणता राजा अशी ओळख असलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला. आगामी लोकसभा निवडणुकीत कोल्हे यांना शिरुर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. देश पातळीवर हवा बदलत असून, शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी आपण राष्ट्रवादीत प्रवेश करत आहोत. पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू, असे डॉ. कोल्हे यांनी यावेळी स्पष्ट केले. 


डॉ. अमोल कोल्हे राष्ट्रवादीत, 'पवारांचे हात बळकट करण्यासाठी प्रवेश'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिरुर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी थेट लढत याआधी पाहायला मिळाली. या ठिकाणी शिवसेनेने बाजी मारलेली दिसून येते. आता अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत घड्याळाची साथ घेतली आहे. त्यामुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोठी चूरस पाहायला मिळणार आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी राष्ट्रवादीने व्युहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मूळचे शिरुरचे असणारे डॉ. कोल्हे यांनाच राष्ट्रवादीने गळाला लावले. शिरुर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीला लोकप्रिय असा उमेदवार सापडत नव्हता. दरम्यान, पवार यांचे नातू येथून उतरविण्यासाठी चाचपणी करण्यात येत होती. तेच लोकसभा निवडणूक लढविणार अशी जोरदार चर्चा होती. मात्र, या चर्चेला पूर्णविराम पक्षाकडून देण्यात आला. त्याआधी अजित पवारांचे नाव चर्चेत आले. मात्र, पवारांनी नातू आणि अजित पवार लोकसभा निवडणूक लढविणार नाही, असे जाहीर केले. त्यामुळे शिरुर मतदार संघातून राष्ट्रवादीचा कोण उमेदवार असणार याचीच जास्त चर्चा रंगत होती. मात्र, कोल्हे यांच्या पक्ष प्रवेशामुळे येथील उमेदवाराचा प्रश्न निकाली निघाल्याची चर्चा सुरु झाली आहे.


राष्ट्रवादीने शिवसेनेचे प्रवक्ते आणि चित्रपट सेनेचे अध्यक्ष डॉ. कोल्हे यांना पक्षात घेऊन शिवसेनेला मोठा दे धक्का दिला आहे. त्यामुळे शिरुरमध्ये शिवसेना संपूर्ण ताकद लावण्याची शक्यता आहे. या ठिकाणाहून शिवसेनेचे उमेदवार कोण असणार, याचीही उत्सुकता आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीने आपले जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यालाच गळाला लावून त्याच्याच माध्यमातून लोकसभा निवडणुकीत शह देण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत येथून कोण बाजी मारतो, याचीच  जास्त उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.