विशाल करोळे, झी मीडिया, पैठण-औरंगाबाद : वयाच्या साठीत असलेल्या सुदामा कोटलेकर हे शेतकरी डोळ्यात पाणी आणत जनावरांना बाजार दाखवतायत. पाच एकर शेती आहे खरी, मात्र नापिकीनं सारंच उद्ध्वस्त... त्यामुळे जनावरांऐवजी शेतीच विकावी असा विचारही त्यांच्या मनात डोकावला. मात्र शेतीला भाव नाही. त्यामुळे जनावरं पुन्हा घेता येतील हा विचार करत जड अंतकरणाने आपल्या बैलांची जोडी विकण्यासाठी ते बाजारात घेऊन आलेत. बैलांवर अखेरचा मायेचा हात फिरवत त्यांनी आपली व्यथा मांडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुष्काळग्रस्त तालुक्यात पाणी आणि चारा दोघांचाही प्रचंड दुष्काळ आहे. त्यामुळं आता जनावरं सांभाळता येत नसल्यानं बळीराजा त्यांना बाजारात विक्रीला आणतोय. मात्र तिथंही भाव मिळत नसल्यानं त्यांना ही जनावरं मातीमोल भावात विकावी लागतायत. पाहूयात दुष्काळग्रस्त पैठण तालुक्यातील बिडकीन गावच्या जनावरांच्या बाजारातील दुर्दैवी चित्र...


Caption

पाणी आणि चाऱ्याअभावी दुष्काळग्रस्त भागात जनावरांना पोसणं शेतकऱ्यांना कठीण झालंय. पोटच्या पोरासारखी काळजी घेतलेल्या जनावरांना बाजारात विक्रीसाठी आणण्याची वेळ आलीय. 


पावसाअभावी शेतात काही पिकलं नाही, पिण्याच्या पाण्याचीही तीच परिस्थिती आणि जनावरांचा चारा घेणंही परवडेना... त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्जा-राजाला विकण्याचा निर्णय घेतलाय. 


दारात तडफडून मरण्यापेक्षा कुणी चांगल्या व्यक्तीच्या घरी किमान जनावरं जगतील, या आशेने शेतकरी जनावरांना बाजारात घेऊन आलेत. 


मात्र इथंही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच... ६० हजाराची बैलजोडी ३० हजाराला मागितली जातेय. जे शेतकऱ्याला परवडण्यासारखं नाही. त्यामुळे करायचं काय? असा प्रश्न शेतकऱ्याला पडलाय. 
 
तर शेतकऱ्यांवर ओढवलेली ही परिस्थिती पाहून व्यापाऱ्यांनाही दुःख होतंय. शेतकऱ्यांच्या जनावरांचा हा बाजार काळीज पिळवटून टाकणारा आहे.


दुष्काळग्रस्त पैठण तालुक्यात पावसाअभावी अनेकांच्या शेतात पिकलं नाही. त्यामुळे चारा-पाण्याची अडचण झाली. त्यामुळे प्रत्यक्ष सरकारी मदत हाती मिळेपर्यंत शेतकरी हतबल आहे.