दुष्काळ, जलयुक्त शिवार प्रश्नी राज्य सरकारला विधीमंडळात घेरणार - काँग्रेस
राज्यातील भयंकर दुष्काळ, फसलेले जलयुक्त शिवार प्रश्नी काँग्रेस सरकारला जाब विचारणार.
गडचिरोली : राज्यातील भयंकर दुष्काळ, फसलेले जलयुक्त शिवार प्रश्नी सरकारला जाब विचारणार आहोत. तसेच विधिमंडळ अधिवेशनात काँग्रेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारला घेरणार आहे, अशी माहिती काँग्रेस नेते आणि विधिमंडळ गट उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिली. ते गडचिरोलीतील प्रश्नांवर आक्रमक झाले आहेत. मेडीगट्टा सिंचन प्रकल्पाने महाराष्ट्राचे नुकसान होणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. लॉयड पोलाद प्रकल्पावरूनही सरकारवर त्यांनी टीका केली आहे.
आगामी विधिमंडळ अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी येथे दिली. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची ३ वर्षांपासून रखडलेली शिष्यवृत्ती, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती व ओबीसी विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणातील प्रलंबित शिष्यवृत्ती, दुष्काळी मदत व कृषिपंपांना वीजजोडण्या देण्यासंदर्भात आवाज उचलला जाणार आहे, असे ते म्हणालेत.
शेतकऱ्यांना सोलर पंप घेण्याची सक्ती केली जात आहे. ही बाब गरीब शेतकऱ्यांना परवडणारी नाही. त्यापेक्षा २०१७ पासून गडचिरोली जिल्ह्यात कृषिपंपाच्या ११०० वीजजोडण्या प्रलंबित आहेत; त्या तत्काळ देण्यात याव्यात, असे वडेट्टीवार म्हणालेत.
राज्यातील दुष्काळग्रस्त ९ हजार गावांना शासनाने कुठलीही मदत केली नाही. शिवाय मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात गुन्हेगारी वाढली असून, पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नाही, अशी टीकाही त्यांनी केली. गडचिरोलीच्या कोनसरी येथे मुख्यमंत्र्यांनी पोलाद प्रकल्पाचे स्वप्न दाखविले होते, त्याची वीट देखील रचली गेली नसल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. टोकावरच्यई सिटोंचा शहरालगत तेलंगणा सरकार मेडीगट्टा धरण बांधत आहे. हे राज्याला नुकसानदायक असल्याचा दावा त्यांनी केला.