गृहिणींनो लगेच मसाला करायला घ्या! मिरचीचे भाव कोसळले; मागील वर्षीच्या तुलनेत दर अर्धापेक्षा कमी
Dry Red Chilli Rates: उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात लाल मिरचीचा वापर केला जातो. मसाल्यासाठी गृहिणी याचा वापर करतात. मात्र, गृहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय.
Dry Red Chilli Rates: उन्हाळा सुरू होताच मसाला, पापड, कुरडईअसे वाळवणाचे पदार्थ करण्याची लगबग सुरू होते. गावा-गावात महिला दिवसभर वाळवणाची कामे करताना दिसतात. वर्षभरासाठी साठवण्यात येतील असे मसाले आणि पापड करण्यात येतात. एप्रिल मे महिन्यात चांगलं कडकडीत उन पडल्यानंतर मसाले बनवण्याची तयारी करण्यात येते. मसाल्यात वापरण्यात येणारी लाल मिरचीने यंदा गृहिणींना दिलासा दिला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मिरची या वर्षी स्वस्त झाली आहे.
देशात महागाईचे नवनवे उच्चांक गाठले जात असताना तुमच्या आमच्या अन्नातील लाल मिरची मात्र पार स्वस्त झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मिरचीचे दर अक्षरशः निम्म्याने कमी झालेत. त्यामुळे तडका देण्यासाठी लागणारी अख्खी मिरची असो वा मसाल्यात वापरली जाणारी मिरची पावडर याचा गृहिणींच्या बजेटवर अजिबात परिणाम होणार नाहीये. यंदा लाल मिरचीचे दर कसे आणि काय आहेत. त्यामागील कारणं जाणून घेऊयात.
यंदा मिरचीचे भाव गडगडले आहे. मागील वर्षी पन्नास वर्षांच्या तुलनेने जास्त भाववाढ मिळाली होती. त्यामुळं शेतकऱ्यांना चांगला नफा मिळाला होता. याचाच परिणाम म्हणून शेतकऱ्यांनी यंदा मिरचीचे जास्त उत्पन्न घेतले होते. पिक जास्त घेतले होते. त्यामानाने मागणी कमी आहे. म्हणून भाव कमी झाले आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेने 50 टक्के भाव कमी झाले आहे.
महाराष्ट्रात उत्पादन कमी आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये तेजा मिरचीचे उत्पादन जास्त प्रमाणात होते. तिथेूनच व्यापार सर्व जगात होते. बेडगी मिरचीचा रंग चांगला असतो त्यामुळं तिचा भावही जास्त असतो. मात्र, बेडगीचा भावही निम्म्याने कमी झाला आहे. कोल्ड स्टोरेजमध्येही जागा नाही त्यामुळं शेतकऱ्यांना माल विकावाच लागतो. त्यामुळं मंदी आहे, अशी माहिती वालचंद संचेती या मिरची व्यापाऱ्यांनी दिली आहे.
मागील वर्षीचे दर / यावर्षीचे दर (प्रति किलो)
>> काश्मिरी ढब्बी
- मागील वर्षीचे दर- 600 ते 700
- यावर्षीचे दर- 300 ते 350
>> बेडगी
- मागील वर्षीचे दर- : 500 ते 600
- यावर्षीचे दर- 250 ते 300
>> गंटूर तेजा :
- मागील वर्षीचे दर- 300
- यावर्षीचे दर- 200