आपलेच घर भाड्याने मिळावे यासाठी डीएसकेंचा अर्ज
डीएसके बिल्डर यांनी आपल्याला आपलेच घर भाड्याने मिळावं यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला
बागेश्री कानडे, झी मीडिया, मुंबई : डीएसके बिल्डर यांनी आपल्याला आपलेच घर भाड्याने मिळावं यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर आज सुनावणी झाली. डीएसके बिल्डर्सचे मालक दीपक कुळकर्णी हा सध्या तुरुंगात आहे. काही हजार कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी त्याला ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. कुलकर्णीवर ईडी विभागाकडून कारवाई सुरू आहे. ईडीने कुलकर्णीची मालमत्ता जप्त केली आहे.
पुणे येथील किर्तीतवाल येथील डीएसके विश्वमध्ये वीला नंबर एक आहे. हा वीला 503 चौ.मीटर जागेवर 355 चौ मीटरचा बंगला आहे. या बंगल्याची किंमत सुमारे अकरा कोटी रुपये आहे. हा बांगला आपल्याला भाड्याने द्याव,आपण साडेतीन लाख रुपये भाडं द्यायला तयार आहोत, असं डीएसके च म्हणणं आहे. त्यावर ईडी आता आपलं म्हणणं येत्या शुक्रवारी मांडणार आहे.
डीएसके यांना या बंगल्यात राहायचं असल्यास बाजार मुल्याप्रमाणे 11 लाख रुपये दर महिना भाडे द्यावे लागेल असे सत्र न्यायालयाने याबाबत स्पष्ट केले. हे मान्य असल्यास 10 दिवसांची मुदत कोर्टाने दिली होती. ही मुदत 25 सप्टेंबरला संपली. त्यामुळे 30 तारखेला ईडीने बंगला ताब्यात घेतला. त्यामुळे राहायला जागा नसल्याने डीएसके यांच्या कुटुंबाने आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यात आम्ही 3 लाख पर्यंतच भाडे देऊ शकतो असे सांगितले. यावर ईडीची बाजू ऐकून निर्णय घेणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.