पुणे : डी. एस. कुलकर्णींना रुग्णालयात उपचारांची गरज असल्याने ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आपला अहवाल सादर केलाय. त्यामुळे तूर्तास तरी त्यांची कोठडीत जाण्याची शक्यता लांबणीवर पडली आहे.


प्रकृतीची तपासणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डीएसके कुलकर्णींना पुण्यातल्या ससून रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असल्याचा अहवाल, ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या पथकानं दिला आहे. दहा डॉक्टरांच्या पथकानं डीएसकेंच्या प्रकृतीची तपासणी केली.


न्यायालयीन कोठडी कायम


 या पथकामध्ये हृदय, मेंदू, अस्थीरोग या सर्व प्रकारच्या तज्ज्ञांचा समावेश होता. डीएसकेंवर उपचार करण्यासाठी आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर तसंच सुविधा ससून रुग्णालयात उपलब्ध असल्याचं ससूनच्या डीननी म्हंटलं आहे. या वैद्यकीय अहवालामुळे डीएसकेंची न्यायालयीन कोठडी कायम राहण्याची शक्यता आहे. 


 तपासाला फटका बसणार


तसंच ते रुग्णालयातच राहणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. आता न्यायालय त्यांना खासगी रुग्णालयात ठेवण्याची परवानगी देतं की त्यांना ससूनमध्ये उपचार घ्यावे लागणार आहे हे दुपारनंतर स्पष्ट होईल. मात्र डीएसकेंची प्रकृती अस्वस्थ असल्याचा फटका तपासाला बसणार आहे. 


डीएसकेंना भोवळ


शनिवारी रात्री कोठडीत भोवळ येऊन पडलेल्या डीएसकेंना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर रविवारी संध्याकाळी ससूनमधून त्यांना पुण्यातल्याच दिनानाथ मंगेशकर या खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. तिथे आज सकाळी ससून रुग्णालयातल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी डीएसकेंची तपासणी केली.