आर्णी : भूसंपादीत जमिनीचा मोबदला न मिळाल्याने आर्णी नगर परिषद क्षेत्रातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. संतप्त शेतकऱ्यांनी नागपूर तुळजापूर राज्य महामार्गाचे काम बंद पाडले. गेल्या दीड वर्षांपासून शेतकरी याचा पाठपुरावा करत आहेत. पण त्यांना खोट्या आश्वासनाखेरीज काहीच मिळाले नाही. या पार्श्वभूमीवर आर्णी, कोळवन, दत्तरामपूर, देऊरवाडी येथील शेतकऱ्यांनी हे आंदोलन पुकारले. महामार्गासाठी शेतकऱ्यांची जमीन संपादीत होऊन अधिसूचना प्रकाशित झाली. संबंधित ठेकेदाराने महामार्गाचे काम देखील सुरू केले. परंतु अद्याप जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


महामार्गाचे अधिकारी गेल्या दीड वर्षांपासून मोबदला देण्याबाबत टोलवाटोलवी करीत आहे. तर दीड महिन्यापूर्वी कलम ३ एच नुसार अर्धवट अवॉर्डची नोटीस देऊन ताबा पावतीवर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या गेल्या. यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांनी मोबदल्याची रक्कम लगेच ऑनलाईन खात्यात जमा करतो असे सांगितले. मात्र अद्यापही मोबदला न मिळाल्याने एसडीओनी आपली दिशाभूल केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. एसडीओ स्वप्नील तांगडे यांच्या कारभारामुळे शेतकऱ्यांचे नुकसान तर झालेच शिवाय हक्काच्या मोबदल्यापासून देखील वंचित राहावे लागले असा आरोप करीत शेतकऱ्यांनी नागपूर तुळजापूर महामार्गाचे काम रोखले आहे.