आशीष अम्बाडे, झी मीडिया, गडचिरोली :  रुग्णवाहिका आहेत मात्र रस्ते नाहीत अशा स्थितीचा सामना करत गडचिरोली जिल्ह्यातील डॉक्टरांनी आज एका बाळ-बाळंतिणीची सुखरूप सोडवणूक केली. गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील मिरुगुडवंचा येथील 'बाली आकाश दुर्वा' या गरोदर महिलेला प्रसुती कळा सुरू झाल्या. स्थानिकांनी गरोदर महिलेला नजीकच्या आरेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहचविण्यासाठी धडपड सुरू केली. त्यासाठी त्यांनी तुफान पाऊस आणि नाले ओलांडून पायी जात आरेवाडा येथे निरोप दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


रुग्णवाहिका आवश्यक असल्याचे सांगताच आरेवाडा येथील प्रा. आ. केंद्राचे डॉक्टर मडावी यांनी तात्काळ गाडीची व्यवस्था केली. मात्र मिरुगुडवंचा गावालगत नाल्यापर्यंतच गाडी जाऊ शकली. मग ग्रामस्थांनी नेहमीचा पर्याय वापरला. महिलेला खाटेची रुग्णवाहिका करून वाहनापर्यंत आणले. तेथून रुग्णवाहिकेद्वारे आरेवाडा प्रा.आ.केंद्रात प्राथमिक तपासणी केली. तेथून डॉ. आमटे यांच्या लोक बिरादरी हेमलकसा दवाखान्यात दाखल केले गेले. 



डॉ अनघा दिगंत आमटे यांनी महिलेची सुखरूप प्रसुती केली. गडचिरोलीच्या दुर्गम भागात आरोग्य केंद्र आहेत पण डॉक्टर नाहीत. दोन्ही आहेत तर रुग्णवाहिका नाहीत. हे सर्व आहेत तर रस्ते नाहीत असे दुष्टचक्र आहे. यातून मार्ग कोण आणि केव्हा काढेल असा प्रश्न निर्माण झाला आहे.