कल्याण : एकीकडे कल्याण मधील डम्पिंग ग्राऊंडचा तिढा काही केल्या संपण्याची चिन्हं दिसत नसताना त्याला लागून असणाऱ्या गणेशघाट परिसरात आणखी एका नव्या डम्पिंग ग्राऊंडच्या पायाभरणीला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या घंटागाड्या या नव्या डम्पिंगची पायभरणी करत असल्यावर शिक्कामोर्तब झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घंटागाडीतून आणलेला कचरा याठिकाणी ओतण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. कल्याण  डोंबिवलीतील कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र बनत चालला असून उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही डम्पिंग ग्राउंड अद्याप बंद झालेले नाही. प्रशासनाकडून हे डम्पिंग ग्राउंड बंद करण्याची केवळ 'तारीख पे तारीख'च दिली जात आहे.


या सर्व पार्श्वभूमीवर आता या डम्पिंग ग्राऊंडला लागून असलेल्या दुर्गाडी गणेशघाट परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणावर कचरा आणून टाकला जातोय. या गणेश घाटाच्या प्रवेशमार्गावर उजवीकडे सर्वत्र कचऱ्याचे मोठाले ढिग जमा झाल्याने त्याची दुर्गंधी पसरत आहे. या कचऱ्याला आग लागत सुद्धा लागत आहे.


विशेष म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या घंटागाड्यामधून आणलेला कचराच या ठिकाणी टाकण्यात येत असल्याची धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनाचा हलगर्जी पण उघड झालाय. कचऱ्याच्या प्रश्नाबाबत प्रशासनाला काहीच देणंघेणं नसल्याचं स्पष्ट होतंय. केडीएमसी आयुक्त तर कशातच लक्ष देत नाहीयेत. मात्र महापौर राजेंद्र देवळेकर यांनी याबाबत प्रशासनाशी त्वरित संपर्क साधत गणेश घाट कचरा मुक्त करण्याचे निर्देश दिले.