मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडीने ही कारवाई केल्यानंतर शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी ईडीवर निशाणा साधला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'लहानपणी क्रिकेट खेळताना एखादा चांगल खेळत असेल तर लगेच एखादा चिडका मुलगा यायचा. माझी बॅट, माझा बॉल म्हणून चिडून बॅट-बॉल घेवून जायचा. तसंच हे ED च प्रकरण चालू असल्याचा संशय येतो. चांगल खेळता येत नसलं की काहीही करून चिडायचं. फक्त एक गोष्ट लक्षात असूदे आपला गडी लय भारी आहे,' अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे.



नियमबाह्यरित्या कर्ज वाटप केल्याचा आरोपानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीपराव देशमुख, ईश्वरलाल जैन, जयंत पाटील, शिवाजीराव नलावडे, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, राजेंद्र शिंगणे आणि मदन पाटील यांच्यासह महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे चेअरमनसह ७० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


राज्य सहकारी बॅंकेचा २५ हजार कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचे ईडीने म्हटले आहे. सहकारी बँकेचे आर्थिक स्थितीत कमकुवत असतानाही सहकारी साखर कारखान्यांना कर्ज मंजूर करण्यात आले. कर्ज वाटप करताना मोठ्या प्रमाणावर अनियमितता होती, असा ठपका ईडीने ठेवला आहे. दरम्यान, सहकारी साखर कारखाने काही विशिष्ट राजकारण्यांच्या जवळच्या नातेवाईकांना विकल्या गेल्याचा दावाही ईडीने केलाय.