ED Raid In Maharashtra: दागिने आणि रोकड पाहून अधिकारीही चक्रावले; नागपूर आणि मुंबईत ईडीची मोठी कारवाई
ED Raid In Mumbai And Nagpur : पॉन्झी स्कीमच्या नावावर 150 कोटींची फसवणूक केल्याच उघड झालं आहे. नागपूर आणि मुंबईत ईडीने मोठी कारवाई करत तब्बल 15 ठिकाणी धाडी टाकल्या आहेत.
ED Raid In Mumbai And Nagpur : अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने महाराष्ट्रात मोठी कारवाई केली आहे. ईडीने नागपूर आणि मुंबईतील 15 ठिकाणी एकाचवेळी धाडसत्र राबवले. या कारवाई दरम्यान पोलिसांनी 5.51 कोटी रुपयांचे बेहिशेबी दागिने आणि 1.21 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. अनेक व्यापाऱ्यांच्या गुंतवणुकीच्या फसवणुकी प्रकरणात ईडीने ही छापेमारी केली आहे.
पंकज मेहाडिया, लोकेश आणि कथिक जैन यांच्या गुंतवणुकीच्या फसवणुकीसंदर्भात ईडीने नागपूर आणि मुंबईतील 15 ठिकाणी शोध मोहिम राबवली. यादरम्यान 5.51 कोटी रुपयांचे बेहिशेबी दागिने आणि 1.21 कोटी रुपयांची रोकड ईडी अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे.
ईडीच्या छापेमारीमुळे नागपुरात खळबळ उडाली आहे. नागपुरात एक-दोन नव्हे, तर एकूण 15 ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत. नागपूरचे अनेक स्टील, लोह आणि रिअल इस्टेट व्यावसायिक ईडीच्या रडारवर आहेत. त्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकल्यानंतर त्यांची चौकशी आणि चौकशी सुरू आहे.
काय आहे नेमका प्रकार?
पंकज मेहदिया, लोकेश जैन, कार्तिक जैन, बालमुकुंद लालचंद कील आणि प्रेमलता नंदलाल मेहदिया या पाच जणांविरुद्ध नागपूरच्या सीताबल्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या तक्रारीच्या आधारे ईडीने तपास सुरू केला. या कथित फसवणूक प्रकरणात या व्यापाऱ्यांनी गुंतवणुकदारांना कोट्यावधींचा गंडा घातला आहे.
ईडीने केलेल्या मनी लाँड्रिंग तपासात पंकज मेहदिया आणि त्यांच्या साथीदारांनी पॉन्झी स्कीम सुरु केली होती. 2004 ते 2017 या कालावधीत केलेल्या गुंतवणुकीवर टीडीएस कापून 12 टक्के खात्रीशीर परतावा देण्याचे आश्वासन देऊन विविध गुंतवणूकदारांना आमिष दाखवले होते.
“2005 ते 2016 या कालावधीत, फसवणूक करुन गुंतवणुकदारांचे पैसे लुटल्याचा आरोप करण्यात आला आहे. पैसे वळवण्यासाठी आणि व्यवहारांना वैध करण्यासाठी, बँक खात्यांमध्ये 150 कोटींहून अधिक व्यवहार झाले आहेत असा संशय आहे. यातील बहुतेक व्यवहार बोगस खात्यांमधून केल्याचे समजते.