जालना : ED raid On Shiv Sena leader Arjun Khotkar : शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची ईडीकडून 12 तास कसून चौकशी करण्यात आली आहे. त्याआधी रामनगर साखर कारखाना खरेदीप्रकरणी जालना येथे ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. (ED raid On Shiv Sena leader Arjun Khotkar’s house At Jalna and interrogate him for 12 hours)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील सत्ताधारी पक्षातील लोकांच्या आणि नेत्यांच्या घरी आणि साखर कारखान्यांवर ईडीकडून छापेमारी करण्यात येत आहे. याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या नातेवाईकांवर केंद्रीय संस्थांकडून छापेमारी करण्यात आली होती. तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची तसेच त्यांच्या पत्नीची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचीही ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. सध्या ते ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांच्या मुलाचीही ईडीकडून चौकशी होणार आहे. राज्यात औरंगाबाद, लातूर, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईत ईडीकडून छापेमारी सुरुच आहे.


 शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची सलग 12 तास चौकशी सुरु होती. रात्री 2 वाजेपर्यंत ही चौकशी सुरु होती. 2 वाजेनंतर ईडीचं पथक औरंगाबादकडे रवाना झाले आहे. रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी अर्जुन खोतकर यांच्या घरावर ईडीने काल छापेमारी केलीय. दरम्यान, याआधी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचीही ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे.



काल दुपारी 2 वाजताच्या दरम्यान खोतकर यांच्या घरी ईडीचे पथक दाखल झाले होते. त्यानंतर सलग 12 तास खोतकर यांची चौकशी करण्यात आली. काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर जालना येतील रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी ईडीकडे केली होती. त्यानंतर काल ईडीच्या पथकाने जालना बाजार समिती कार्यालय, अर्जुन खोतकर यांचे बंधू संजय खोतकर यांचे कार्यालय आणि खोतकर यांचे निवासस्थान अशा तीन ठिकाणी छापेमारी केली. तसेच काही महत्वपूर्ण कागदपत्रे देखील ईडीने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.