ED Raids : छत्रपती संभाजीनगर येथे 9 ठिकाणी ईडीचे छापे
ED raids in Chhatrapati Sambhajinagar : PM आवास योजना गैरव्यवहार प्रकरणात छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत. योजनेतला एक कंत्राटदार, एक डॉक्टर आणि इतर ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहेत. घरांसाठी एकाच लॅपटॉपवरुन निवदा भरण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
ED raids in Chhatrapati Sambhajinagar : पंतप्रधान आवास योजना गैरव्यवहार प्रकरणात आज संभाजीनगरात 9 ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत. योजनेतला एक कंत्राटदार, एक डॉक्टर आणि इतर ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहेत. या प्रकरणी ईडीकडून ही छापेमारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळीच ईडीकडून शहरातील 3 ठिकणी छापेमारी करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली. त्यानंतर ईडीने नऊ वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली असल्याचे समोर आले आहे.
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा पंतप्रधान आवास योजनेत संभाजीनगरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप होता. त्यात आज सकाळपासून ईडीने छापमारी सुरू केलीय. सकाळच्या विमानाने जवळपास 15 लोकांचे पथक संभाजीनगरात दाखल झाले.आणि कंत्राटदार, त्याच्याशी संबंधित एकूण 9 ठिकाणांवर छापेमारी सुरु केली. कासारी बाजार,नाज गल्ली, आकाशवाणी, सिडको, समर्थनगर, जवाहर नगर पोलीस स्टेशन जवळ घर आणि कार्यालयावर ही छापमारी सुरु आहे. याबाबत काही कागदपत्र ईडीने आधीच महापालिकेकडून मागवून घेतली होती त्या पुन्हा काही कागदपत्र आज जप्त केली आहे. (ED Raids Chhatrapati Sambhajinagar )
शहरात गोरगरिबांसाठी 40 हजार घरे बांधताना महापालिकेने सुमारे साडे चार हजार कोटी रुपयांच्या कामात नियमबाह्यपणे ठेकेदारावर कृपा दाखवली होती असा आरोप आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सुमारे साडे चार हजार कोटी रुपये खर्चून सात ठिकाणी तब्बल 39 हजार 760 सदनिका बांधण्यात येणार होत्या. मात्र या कामाचे सर्व नियम आणि धोरणे पायदळी तुडवून पालिकेने नव्याने निविदा पक्रिया न राबवता केवळ ठेकेदाराच्या मर्जीनुसार प्रकल्पाची आखणी केल्याची आणि त्यात मोठा घोटाळा झाल्याचीबाब उघडकीस आल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माणमंत्री देवेंद्र फडनवीस यांनीही चौकशी केली, त्यानंतर प्रधानमंत्री कार्यालयाने याची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते.. याबाबत ईडी कडे तक्रार दिल्यानंतर ईडीने या घोटाळ्याची चौकशी सुरू केली होती.
संभाजीनगर महापालिकेच्या हद्दीत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या टेंडरमध्ये घोटाळा झाला असून, एकाच लॅपटॉपवरून (आयपी ॲड्रेस) टेंडर (निविदा) भरण्यात आल्याचे उघडकीस आल आहे, त्यामुळं महापालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांच्या तक्रारीवरून तीन कंत्राटदार कंपन्यांसह त्यांच्या 19 मालक - भागीदारांविरोधात सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे निविदा अंतिम करणे, कंत्राटदार निश्चित करण्यात गुंतलेले मनपातील तत्कालीन अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
समरथ मल्टीविज इंडिया, पुणे येथील सिद्धार्थ प्रॉपर्टीज, नवनिर्माण कन्स्ट्रक्शन यासह चार कंपन्यांनी निविदा भरली होती. 40 हजार घरांसाठी चार हजार कोटींचा हा घरकुलाचा प्रकल्प उभारला जाणार होता. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पडेगाव, तीसगाव, हर्सल, सुंदरवाडी, चिकलठाणा या ठिकाणची १२८ हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्यात आली होती.
या प्रकरणी यापूर्वीच शहरातील सिटी चौक पोलिसात 40 हजार घरांच्या जवळपास 4 हजार कोटींच्या या प्रकल्पात अनेक मोठे नेते अडकण्याची शक्यता आहे. याप्रकरणी महापालिका उपायुक्त अपर्णा थेटे यांनी तक्रार केल्यानंतर सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर चौकशीला सुरुवात झाली. आकाशवाणी परिसर येथे कंत्राटदार संबंधित या क्लिनिकवर ईडीचे लोक आले आहेत. त्यांचीही चौकशी करण्यात येत आहे.
काय आहे प्रकरण
महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत हर्सुल, पडेगाव, तिसगाव येथे 19.22 हेक्टर क्षेत्रावर ही घरकुल योजना राबविण्यासाठी विकासक नियुक्तीसाठी 17 फेब्रुवारी 2022 रोजी निविदा काढली होती. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवून 11 मार्च 2022 रोजी महापालिकेने मे समरथ कन्स्ट्रक्शन यांना या घरबांधणीसाठी इरादापत्र दिले. मात्र त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याच योजनेसाठी महापालिकेला सुंदरवाडी, चिकलठाणा या ठिकाणी आणखी तीन भूखंड देण्यात आले या ठिकाणी नव्याने निविदा प्रक्रिया न राबवता महापालिकेने तडजोडी अंतर्गत याच कंत्राटदाराला या नव्या ठिकाणीही घर बांधण्याची कामे दिली, या करारा आधारे संबंधित ठेकेदाराने हुर्सल, पडेगाव, तिसगाव, सुंदरवाडी आणि चिकलठाणा या सात ठिकाणी 39 हजार 760 सदनिका बांधण्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला. त्याला नंतर राज्य आणि केंद्र सरकारने ही मान्यता दिली.