जळगाव : कुणीही एकाच पक्षाचा शिक्का लावून कायमस्वरूपी तिथं राहत नाही, असं सांगत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी पुन्हा खळबळ उडवून दिलीये. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात दिपनगर इथं लेवा समाजाच्या गुणवंतांच्या गौरव सोहळ्याला खडसे उपस्थित होते. यावेळी, काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी खडसेंवर झालेल्या अन्यायाला व्यासपीठावर वाचा फोडून खडसेंना काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं आवाहन केलं.... याला उत्तर देताना खडसेंनी हे विधान करत भाजपामधली आपली नाराजी प्रकट केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अन्याय झाला तेव्हा वेळीच प्रतिकारदेखील करायला हवा... तरच समोरच्याला आपल्या शक्तीची जाणीव होते असंही खडसे म्हणाले. 


याआधीही, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त करण्यात मागे-पुढे पाहिलेलं नाही. फडणवीस सरकारच्या चौथ्या वर्षपूर्वीचं औचित्य साधून माजी मंत्री खडसे यांनी पुन्हा एकदा स्वपक्षीयांवर टीकेची तोफ डागली होती. सरकारला ४ वर्ष पूर्ण होत असताना त्यावेळी शपथ घेतलेले आपण एकमेव मंत्री आज मंत्रिमंडळाच्या बाहेर असल्याची नाराजी खडसेंनी व्यक्त केली होती.


उल्लेखनीय म्हणजे,  मे २०१८ मध्ये भोसरी येथील एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणी राज्य शासनाचे कोणतेही नुकसान न झाल्याचा अहवाल देत एसीबीने माजी मंत्री एकनाथ खडसे यांना क्लिनचिट दिली. यावेळीही, 'सुपारी घेऊन बेछूट आरोप करण्यात आले. त्यात तत्थ नसल्याचं नेहमीच सांगत होतो, पण कुणीच ऐकून घेतलं नाही याचं जास्त दुःख आहे' असं म्हणत खडसेंनी आपल्या भावना मोकळ्या केल्या होत्या.