जळगाव : मराठवाडा, कोकणातून प्रत्येकी तीन मुख्यमंत्री झाले. मात्र उत्तर महाराष्ट्रातला मुख्यमंत्री होऊ दिला नाही. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आला, त्याला बाजूला सारले गेले अशी खंत, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. त्याचवेळी मला उध्वस्त करण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांच्यामुळे त्रास झाला. मला जो त्रास झाला तो फक्त फडणवीस यांच्यामुळे म्हणून त्यांचे नाव घेतो, असे जाहीर वक्तव्य खडसे यांनी केले. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत वादाला तोंड फुटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खडसे पुढे म्हणालेत, आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ड्राय क्लिनर होते. आरोप झालेल्या प्रत्येकाला त्यांनी क्लीन चिट दिली. पण नाथाभाऊला मात्र त्यांनी क्लीन चीट दिली नाही, अशी व्यथाही खडसे यांनी यावेळी बोलून दाखवली. जळगावातल्या मुक्ताईनगरमध्ये 'जनसेवेचा मानबिंदू एकनाथ खडसे' या पुस्तकाचे प्रकाशन एकनाथ खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. या ऑनलाईन प्रकाशन कार्यक्रमावेळी खडसेंनी आपले मनोगत मांडले. त्यावेळी फडणवीस यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले.


नाथाभाऊ पक्ष का सोडत नाही, असे कार्यकर्ते विचारतात. नाथाभाऊने काही काळबेरं केलं म्हणून नाथाभाऊ पक्ष सोडत नाही का, असं काहीही नसून अनेक पक्षातून आजही ऑफर आहे. महाराष्ट्रातील जनतेला विचारून लवकरच निर्णय घेईल, असा थेट इशारा त्यांनी पक्षाला दिला आहे.


दरम्यान, मला जो त्रास झाला, तो फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे म्हणून त्यांचे नाव घेतो. मला उध्वस्त करण्याचे काम केले. मला पक्षाचा कधी विरोध झाला नाही तर व्यक्तीने केला. माझी ताकद माझा कार्यकर्ता, माझी जनता, असे सांगत नव्या वाटचालीबाबत सांगताना त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिले आहेत.