खडसे राष्ट्रवादीत गेल्याने भाजपाचा हा बालेकिल्ला ढासळला?
एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशानंतर त्यांचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगरमध्ये भाजपनं पक्षबांधणीसाठी बैठक घेतली. या बैठकीला
जळगाव : एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशानंतर त्यांचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगरमध्ये भाजपनं पक्षबांधणीसाठी बैठक घेतली. या बैठकीला खासदार रक्षा खडसे यांनी उपस्थिती लावली. मात्र भाजप नेते गिरीश महाजन यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. मुंबईला महत्त्वाचं काम निघाल्यामुळे गिरीश महाजन यांना बैठकीला उपस्थित राहता आलं नसल्याचं जिल्हाध्यक्षांनी सांगितलं. या बैठकीला बहुतांश कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याचंही दिसून आलं.
जळगाव जिल्ह्यात भाजपसाठी पुढील वाटचाल अवघड होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दोन दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांनी जळगावला भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. मात्र त्या बैठकीला रक्षा खडसे यांनी दांडी मारली होती.
धुळे, जळगाव आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला एकमेव जागेवर समाधान मानावं लागलं होतं. अमळनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या तिकिटावर अनिल भाईदास पाटील हे निवडून आले आहेत.
एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत आता दाखल झाले आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाला खानदेशात पुन्हा सुगीचे दिवस येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. एकंदरीत खडसेंची नाराजी दूर करण्यात भाजपाला जे अपयश आलं, त्याचा सामना प्रत्येक निवडणुकीत भाजपाला करावा लागणार आहे. हे आव्हान आता गिरीश महाजन यांना पेलावं लागणार आहे. गिरीश महाजन जळगाव जिल्ह्यात भाजपा वाढवतात किंवा आहे तेवढ्या जागा टिकवून ठेवतात हे पुढील निवडणुकांमध्येचं समजू शकणार आहे.