Support For Girish Mahajan For CM Post: भारतीय जनता पार्टीमधून (BJP) राष्ट्रवादीमध्ये (NCP) गेलेल्या आणि विधानपरिषदेचे आमदार झालेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी मुख्यमंत्रीपदासंदर्भात (Maharashtra CM) मोठं विधान केलं आहे. जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ खडसेंनी थेट त्यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनाच मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र ही तयारी दर्शवताना त्यांनी एक अट घातली आहे.


दोघांमध्ये वाद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खान्देशामधील राजकारणामध्ये एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामधील वाद हा कायमच चर्चेचा विषय असतो. या दोघांमधील वाद आणि शाब्दिक टोलवा टोलवी ही कायमच प्रसारमाध्यमांमध्येही चर्चेचा विषय असते. स्थानिक पातळीपासून ते अगदी राज्य पातळीवरही बोलताना हे दोन्ही नेते एकमेकांच्यू भूमिकांना विरोध करताना किंवा टोलवा टोलवी करताना दिसतात. मात्र आज जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसेंनी थेट गिरीश महाजन यांना मुख्यमंत्री केलं तरी आपली हरकत नसल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचाही उल्लेख केला आहे.


...तर महाजनांना पाठिंबा


प्रसारमाध्यमांशी खान्देशाच्या प्रगतीबद्दल बोलताना आपण या भागाच्या विकासासाठी अगदी राजकीय विरोधकालाही पाठिंबा देण्यास तयार आहोत, असं खडसे म्हणाले. "सुरेश दादा जैन मुख्यमंत्री व्हावे यासाठी मी बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली होती. मात्र मला जो मुख्यमंत्री पाहिजे आहे तो कार्यक्षम दूरदृष्टीचा व सामाजिक हिताचा निकष पूर्ण करणारा मुख्यमंत्री पाहिजे असल्याचे मत त्यावेळी मी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे व्यक्त केले होते," असं खडसे जुनी आठवण सांगताना म्हणाले. तसेच पुढे बोलताना खडसेंनी, "सार्वजनिक हिताच्या दृष्टीने त्याने आतापर्यंत केलेल्या कामांचा आढावा घेतला तर त्याचं स्थान वरचं असलं पाहिजे. या निकषात आता जर गिरीश महाजन बसत असतील तर काय अडचण आहे? मला कुठलीच अडचण नाही," असं खडसे म्हणाले.


माझा कट्टर दुश्मन असेल तरी चालेल


"या भागामधील प्रकल्प मंजूर करणारा मंत्री असेल तर माझा त्याला पाठिंबा आहे. येथील प्रकल्प मंजूर करणारा कोणीही आज तयार असला तर माझा त्यांना पाठिंबा आहे. मला विद्यापीठ, पशुवैद्यकीय विद्यापीठ, मंजूर केलेले प्रोजेक्ट आणून द्या. मला खानदेशमधील सिंचनासाठी मंजूर केलेला आणि इतके वर्ष प्रलंबित असलेल्या प्रकल्पांचा पैसा द्या. हे आणून देणारा अगदी माझा कट्टर दुश्मन असेल तरी चालेल मी त्याला पाठिंबा देईल," असं खडसे म्हणाले.


खान्देश सुजलाम, सुफलाम झाला पाहिजे


"हा भाग (खान्देश) सुजलाम, सुफलाम झाला पाहिजे हे जे स्वप्न आम्ही पाहतोय. ज्याला मंजुरी मिळाली आहे ते पूर्ण करावं अशी माझी अपेक्षा आहे," असं सांगतानाच खडसेंनी हे पूर्ण करण्यासंदर्भात पुढाकार घेणाऱ्या कोणत्याही नेत्याला अगदी तो कट्टर विरोधक असला तरी आपण पाठिंबा देऊ असं स्पष्ट केलं.