जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे नाराज आहेत. ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा आहे. दरम्यान, असे असतानाच आता खडसे समर्थक आक्रमक झाले आहेत. महानगरपालिकेमधील भाजपची सत्ता बरखास्त करण्याची मागणी खडसे समर्थकांनी केली आहे. 'वॉटर ग्रेस' प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करत खडसे समर्थक आणि माजी नगरसेवकांनी मनपा आयुक्तांची भेट घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत जाण्याची चर्चा सुरू असतानाच खडसे समर्थक आणि भाजपच्या माजी नगरसेवकांनी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांची भेट घेऊन भाजपची सत्ता बरखास्त करण्याची मागणी केली आहे. माजी नगरसेवक रवींद्र पाटील, अशोक लाडवंजारी, सुनील माळी यांनी भेट घेतली. जळगावात खडसे आणि गिरीश महाजन यांचे समर्थक असे दोन गट आहेत. 


सोमवारी खडसे समर्थक आणि भाजपच्या माजी नगरसेवकांनी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांची भेट घेऊन मनपातील भाजपची सत्ता बरखास्त करण्याची मागणी केली आहे. शहरात अराजकता माजली असून, नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याने महापालिका बरखास्त करा, अशी मागणी करीत खंदे समर्थक माजी नगरसेवकांनी सत्ताधारी भाजपला घरचाच आहेर दिला आहे.


माजी नगरसेवक रवींद्र पाटील, अशोक लाडवंजारी, सुनील माळी यांनी मनपात येऊन आयुक्त सतीश कुलकर्णी यांची भेट घेतली. आयुक्तांच्या दालनात तब्बल पाऊण तास चाललेल्या चर्चेमध्ये मनपात विविध बेकायदेशीर ठराव पारित केले जात असल्याचा आरोप माजी नगरसेवकांनी केला. याप्रकरणी मनपा आयुक्तांनी चौकशी करावी, अशी मागणीही नगरसेवकांनी केली, अशी सूत्रांकडून माहिती मिळाली. मात्र याबाबत त्यांना विचारले असता माझ्या प्रभागातील समस्या संदर्भांत आयुक्तांना भेटायला गेल्याचे सांगत याबद्दल जास्त बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे.


मी माझ्या वैयक्तिक कामासाठी आयुक्तांना भेटायला गेलो होतो. माझ्या परिसरात जेथे मी आधी नगरसेवक होतो, त्या ठिकाणी अनेक समस्या आहेत. त्यासंदर्भात मी भेटायला गेलो होतो. परंतु माध्यमांनी याचा वेगळा अर्थ घेतला. त्यांच्याच नगरसवेकांनी मागेही मागणी केली होती. मनपा बरखास्त होण्याचा निर्णय आयुक्त घेतील, असे खडसे कट्टर अशोक लाडवंजारी म्हणाले.