मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता
आता मतदान करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने मतदार छायचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.
ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या मतदारसंघांचे मतदान 19 एप्रिलला पार पडले. तर 26 एप्रिल 2024 रोजी महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ तर मराठवाड्यामधील हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. येत्या 7 मे रोजी मतदान पार पडणार आहे. आता मतदान करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने मतदार छायचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.
भारत निवडणूक आयोगाने मतदान करण्यासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले जाणार असल्याची माहिती दिली आहे. यापैकी कोणताही एक पुरावा दाखवल्यानंतर संबंधित व्यक्तींना मतदान करता येणार आहे. मतदारांना छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र त्यांची ओळख पटवण्यासाठी मतदान केंद्रावर सादर करता येणार आहे. त्यासोबतच हे 12 पुरावेही ग्राह्य धरण्यात येणार आहे.
मतदान करण्यासाठी 'या' 12 ओळखपत्रांना मान्यता
पारपत्र (पासपोर्ट)
वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स)
केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र
बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक
पॅनकार्ड
राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड
मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र
निवृत्तीवेतनाची दस्तावेज
संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र
आधार कार्ड
भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र
कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
या 12 पुराव्यांसह प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे. तसेच सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान केंद्र, यादी भाग क्रमांक, मतदानाची तारीख, वेळ इत्यादी माहितीच्या चिठ्ठ्यांचे निवडणूक कार्यालयाकडून वितरण करण्यात येत आहे. मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना मतदार माहिती चिठ्ठी आणि छायाचित्र ओळखपत्र सोबत न्यावे, असे आवाहनही जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
दरम्यान लोकसभा मतदारसंघ क्षेत्राचा विस्तार लक्षात घेता नागरिकांनी मतदानापूर्वी आपल्या मतदान केंद्राची माहिती घ्यावी. जिल्हा प्रशासनाने मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे यादृष्टीने मतदान केंद्राची माहिती देण्यासाठी मतदार सहाय्यता केंद्र स्थापित केले आहेत. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर किंवा ॲपद्वारेही ही माहिती मिळू शकेल. मतदारांना वितरीत करण्यात येणाऱ्या मतदार माहिती चिठ्ठीद्वारेदेखील कुठे मतदान करायचे आहे, ते कळू शकेल. मतदारांनी मतदार ओळखपत्र किंवा वरीलपैकी एक ओळखीचा पुरावा सोबत ठेवून मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.