बदलापूर : बदलापूर आणि अंबरनाथ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बॅरेज धरणाच्या जलशुद्धीकरण प्रकल्पात पुराचे पाणी गेल्याने अंबरनाथ आणि बदलापूर शहरांना होणारा पाणीपुरवठा तीन दिवस बंद राहणार आहे. जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या दुरूस्ती कामाला वेळ लागणार असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्यावतीने नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे. उल्हास नदीच्या तिरावर असणारं बॅरेज धरण आणि उल्हास नदीचा प्रवाह एकच झाल्याने आजुबाजूचा परिसर अक्षरश: जलमय झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बदलापूर कर्जत महामार्गावरील चामटोली गावा जवळ असणाऱ्या पाणवठा या प्राण्याच्या आश्रमात काल रात्रीपासून 11 जण अडकून पडले होते त्यांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. तसंच या आश्रमातील 70 प्राणी, यात कुत्रे, माकड, गाय, बदक हे प्राणी सुद्धा अडकले होते त्यांची ही सुटका करण्यात आली आहे. या सर्वांची NDRF टीम आणि स्थानिकांच्या मदतीने सुटका करण्यात आली.


कोपरमध्ये चाळींमध्ये भरलं पाणी


कल्याण डोंबिवली परिसरातही पावसाने थैमान घातलं आहे. काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने तसंच उल्हास आणि वालधुनी नदी दुथडी भरून वाहू लागल्याने सखल भाग जलमय झाला होता. तर सकाळी भरतीची वेळ असल्याने डोंबिवलीच्या कोपर स्टेशनलगत असलेल्या सुमारे 500 चाळींमध्ये पाणी भरल्याने तिथल्या नागरिकांना कोपर स्टेशनचा आसरा घ्यावा लागला. तब्बल 12 तास होऊनसुद्धा एकही लोकप्रतिनिधी किंवा महापालिकेचा अधिकारी फिरकले नसल्याचं सांगत नागरिकांनी संताप व्यक्त केला.


पुराच्या पाण्यात पोहणे पडले महागात 


टिटवाळ्यातील रिजेन्सी परिसरात राहणाऱ्या एका युवकाला पुराच्या पाण्यात पोहयाला उतरण्याचं धाडस अंगलट आलं. तब्बल अड्डीच तासानंतर पुराच्या पाण्यात वाहत असलेल्या युवकास अटाळीतील कोळी बांधवांनी आपल्या होडीच्या मदतीने वाचविल्याने त्यास जीवनदान मिळालं.  टिटवाळा रिजेन्सी परिसरात राहणारा हा युवक पुराच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरला. पण पुराच्या पाण्याचा वेगामुळ तो वाहत तब्बल अड्डीच तासानंतर अटाळी काळू नदीपत्रात आला. यावेळी अटाळी परिसरातील स्थानिक कोळी बांधवांनी त्याला आपल्या होडीच्या मदतीने पुराच्या पाण्यातुन बाहेर काढलं.