चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, बदलापूर: एलफिन्स्टन रोडच्या पुलावर शुक्रवारी झालेल्या चेंगराचेंगरीत बदलापूरच्या २९ वर्षांच्या चंदन सिंग यांचा मृत्यू झाला.  चंदन यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबीयांनी जगण्याचा एकमेव आधार गमावलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बदलापूरला राहणारा चंदन एका कन्स्ट्रक्शन कंपनीत नोकरी करत होते. दोनच महिन्यांपूर्वी त्याने बदलापूरच्या शिरगाव परिसरात स्वतःचं घर घेतलं होतं. मात्र, घराला घरपण येण्याआधीच चंदन त्याच्या कुटुंबीयांना सोडून गेले.


एलफिन्स्टनच्या पूलावर झालेल्या चेंगराचेंगरीत चंदन यांचा मृत्यू झाला. चंदन यांचा मृत्यू गुदमरुन झाला नाही तर त्याची रेल्वेनं हत्या केल्याचा आरोप चंदन यांची पत्नी प्रीती सिंगने केलाय.


चंदन हे मूळचे मध्य प्रदेशातले.... चंदन यांचे मध्यप्रदेशातलं कुटुंब मोठं आहे आणि या सगळ्या कुटुंबाचा चंदन हे एकमेव आधार होते. चंदन यांना दोन वर्षांचा मुलगा आहे. बाबा अजून घरी का आले नाहीत, असं चंदन यांचा मुलगा गणेश सतत विचारतोय.


चंदन यांच्या पत्नीला आता सरकारनं नोकरी द्यावी, अशी त्याच्या कुटुंबीयांची मागणी आहे. सरकारनं दिलेल्या आर्थिक मदतीनं माझा पती परत येणार का, असा आर्त सवाल चंदन यांच्या पत्नीचा आहे.